५१४ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
उभे रहा वगैरे. खरे म्हटले असता जर कोणी आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग. कोणाचे चुकत असेल तर ते स्पृश्य वर्गाचे. पण त्या स्पृश्य वर्गाची सभा करून त्यांची कानउघाडणी करतील तर हराम आहे. हिंदू धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा, तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टींची आठवण करून देणे आवश्यक वाटते. गेल्या महायुध्दात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लढाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे. तो उद्बोधक असल्याकारणाने त्याचा याप्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते. संवादाचा विषय लढाई कोठपर्यंत चालू ठेवावयाची या संबंधाने होता. त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज माणसाने मोठ्या तोऱ्याने सांगितले की, ' शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यंत आम्ही ही लढाई ag. हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की, अस्पृश्यतेचा हा लढा आम्ही अखेरपर्यंत लढू , ' तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत ही लढाई लढू , ' असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो. दुसऱ्याचे शीर तळहातावर घेऊन युध्दाला निघणाऱ्या योद्धयापासून विजयश्रीची आशा.धरणे कितपत रास्त आहे, हे ठरविणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये. आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हशील आहे ! हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. या पलिकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मातर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा ? व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी ? हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मातराशिवाय प्राप्त होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. अस्पृश्यांना समतेचे स्थान प्राप्त करून घ्यावयाचे आहे, ही गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरीच त्यांच्या चळवळीचा एक हेतू आहे परंतु ही समता प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी हिंदू धर्मातच राहिले पाहिजे, नाहीतर समता प्राप्त व्हावयाची नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात. हिंदू धर्मातं राहून समता मिळवावयाची किंवा धर्मातर करून समता मिळवावयाची. हिंदू धर्मात राहून समता प्राप्त करावयाची झाल्यास आपल्यातील नुसती शिवाशीव जाऊन