१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोमन लोकातील गुलामगिरीपेक्षा वाईट असेच म्हणावे लागते. रोममधील गुलामांच्या Sadan are जितकी त्यांची गुलामगिरी येत असे त्याच्या अनेक पटीने आमच्या आड आमची अस्पृश्यता येत आहे असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. हे घाणेरडं धंदे करतात, गुरे फाडतात, मोच्या-नाले उपसतात, गलिच्छ वस्त्रे वापरतात, अभक्ष भक्ष्य खातात, नानाप्रकारच्या बीभत्स प्रकारच्या देवतांची पूजा करतात, अशाप्रकारचे एक नव्हे, दोन नव्हे, नऊ लक्ष आरोप आपल्यावरती करण्यात येतात. आरोप करणे अगदी सोपे आहे; पण त्या आरोपाला जबाबदार कोण आहे; याचा आरोप करणारे तितका विचार करीत नाहीत.
खरे म्हटले असता जे आरोप करतात त्यांच्यावरच त्याची जबाबदारी पडते. मनुष्यसमाजातील पिढ्या एकामागून एक मरून जातात परंतु पुढची पिढी आपले सर्व संप्रदाय, चालीरिती, धर्मभावना इत्यादी सर्व संस्कृती, आपल्या मागच्या पिढीपासून शिकून घेते. तेणेकरून समाजातील घटक जरी लुप्तप्राय झाले तरी समाज हा अव्याहत चालू राहतोच. आजच्या हिंदू समाजात अशा प्रकारचे संघटन मुळीच होत नाही. आमच्यातील हे भूदेव, त्यांचा आमचा संबंध तर कधीच जवळून येत नाही, मग त्यांच्या चालीरिती आमच्यात याव्या कशा? उपनिषदातील तत्त्वे जर आमच्या कानी घालण्यास ते तयार नाहीत तर आमची मरीआईची पूजा कशी जाणार ? वेद आम्ही ऐकू नये अशी जर त्यांची आज्ञा आहे तर आमच्या लावण्या सुटणार कशा? आम्हाला मुंज करून
जानवे घालण्याचा त्यांनी निश्चय केला तर आम्ही शुचिर्भूत राहाणार नाही काय? सारांश, आमच्यात वाईटाचा संचार झाला आहे, असा जर आमच्यावर आरोप लावण्यात येत आहे, तर आमचे उत्तर हे आहे की, चांगल्याची शिकवणूक आम्हाला कोणी दिली ? ब्राह्मणाच्या मुलात ब्राह्मणाच्या चालीरिती किंवा आमच्यातील खिस्ती झालेल्यात खिस्ती लोकांच्या चालीरिती यांचा प्रादुर्भाव कसा होतो व ब्राह्मणाच्या चालीरितीचा प्रादुर्भाव आम्हा अस्पृश्यात का होत नाही याचा बारकाईने विचार केला असता सहज कळून येण्यासारखे आहे की, अशा प्रकारचा प्रादुर्भाव होण्यास उभय पक्षात जिव्हाळ्याचा, निकट व अन्योन्य संबंध असावा लागतो. अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजातील वरिष्ठात तशा प्रकारचा संबंध येणे शक्य नाही. यामुळेच ज्या त्या समाजाच्या बऱ्या-वाईट चालीरिती ज्या त्या समाजास चिकटून राहिल्या आहेत. रोमन लोकातील गुलामगिरीत अशा प्रकारच्या अस्पृश्यतेच्या छटा नसल्यामुळे वरिष्ठांच्या गुणगुणण्याचा पाठ त्यांच्या नित्य नजरेसमोर असे इतकेच नव्हे तर तो ते गिरवीत असत.