५१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जातीभेदाला त्रासून धर्मातर करण्यात काही अर्थ नाही, असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात. कोठेही गेलात तर तेथे जातीभेद आहेच, मुसलमानात गेलात तरी त्यांच्यात जातीभेद आहेच, खिस्त्यात गेलात तरी त्यांच्यातही जातीभेद आहेच असे हिंदू लोक सांगतात. दुर्दैवाने ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की, हिंदुस्थानातील अन्यधर्मीय समाजामध्ये सुध्दा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे. पण या पापाचे धनी हिंदू लोकच आहेत. मुळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे. त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे. ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे. खिस्ती व मुसलमान यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदुतील जातीभेदासारखाच आहे, असे म्हणणे कोत्यापणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हिंदुतील जातीभेद व मुसलमान व खिस्ती यांच्यातील जातीभेद या दोहोंमध्ये मोठे अंतर आहे. पहिल्याप्रथम ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की मुसलमान व खिस्ती यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद समाजाचे प्रमुख अंग आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही, ' तू कोण ? ' याला' मी मुसलमान आहे, ' ' मी खिस्ती आहे ' एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तरावरून सर्वांचे समाधान होते. ' तुझी जात काय ?' असे विचारण्याची कोणासही आवश्यकता भासत नाही. परंतु कोणाही हिंदुला ' तू कोण ? ' असा प्रश्न विचारला असताना मी हिंदू , ' असे उत्तर त्याने दिले तर तेवढ्याने कोणाचेही समाधान होऊ शकत नाही. ' तुझी जात काय ?' असा प्रश्न विचारण्यात येतो व त्याचे उत्तर दिल्याशिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमज पडत नाही. यावरून [हिंदू समाजात जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व खिस्तीसमाजात तिला कसे गौणपद प्राप्त झाले आहे, हा मुद्दा वरील विवेचनावरून आपोआपच सिद्ध होऊ शकतो. याशिवाय हिंदुतील जातीभेद व मुसलमान व खिस्ती यांच्यामधील जातीभेद यामध्ये आणखीही एक महत्त्वाचा फरक आहे. हिंदुतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदुंचा धर्म आहे. मुसलमान व खिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी त्यांच्या धर्माचे अधिष्ठान नाही. हिंदुंनी ' जातीभेद मोडू ' असे म्हटले असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल. परंतु खिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभिला तर त्यांचा धर्म त्यांच्याविरूद्ध येऊ शकणार नाही. हिंदुंना धर्मनाश केल्याशिवाय जातीविध्वंसन करता येणार नाही. मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जातीनाश करण्याकरिता धर्मनाश करण्याचे काही कारण नाही. जातीनाशाच्या कामात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या धर्माचा अशा कार्याला फार मोठा पाठिंबा मिळू शकेल. जातीभेद सर्वत्रच आहे, असे जरी कबूल