३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 561

मुक्ती कोन पथे ? ५१७

केले तरी हिंदूधर्मातच राहा, असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही, जातीभेद ही गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तिव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर, सहज व सुलभपणे मोडता येईल, त्या समाजात जा, हाच खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे, असे मानावे लागेल.

“ नुसत्या धर्मांतराने काय होणार ? तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा, ' असे काही हिंदू लोक सांगत आहेत. या प्रश्‍नाने आपल्यापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्या प्रश्‍नांचा विचार करणे मला आवश्यक वाटते. प्रथमतः प्रश्‍न असा की, तुमची आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे ? तुम्ही किंवा तुम्हाला जे असा उपदेश करतात ते ? जे हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात, ते बोलण्यापलिकडे तुमच्याकरिता काही करतील, असे मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारीही मला दिसत नाही. उलट जो तो हिंदू आपापल्या जातीपुरती दृष्टी ठेऊन आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे. ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरिता सुतिकागृहे, ब्राह्मण मुलांकरिता स्कॉलरशिप, ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या. मिळवून देण्याची सोय यामध्ये गुंतले आहेत. सारस्वत तसेच करीत आहेत. कायस्थ करीत आहेत, मराठे तसेच करीत आहेत. जो तो आपापल्याकरिता व ज्याला कोणी नाही त्याचा परमेश्वर, अशी स्थिती आहे. तुमची उन्नती तुम्हीच करावयाची, दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही, अशी जरी खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हशील आहे ? नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्यापलिकडे याचा दुसरा काही हेतू दिसत नाही. तुमची स्थिती तुम्ही सुधारावयाची असेच जर असेल तर या हिंदू लोकांच्या तर्कटाकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा काही अधिकारही नाही. तथापि, एवढेच सांगून हा प्रश्‍न सोडून देण्याचा माझा विचार नाही, त्याचे खंडन करणे मला आवश्यक आहे.

नुसत्या धर्मांतराने काय होणार ? असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचारशून्यतेचे मला मोठे आश्चर्य वाटते. हिंदुस्थानातील शीख, मुसलमान व खिस्ती हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शूद्र व अस्पृश्य होते. ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला, ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडून मुसलमानी धर्म स्वीकारला, ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून खिस्ती धर्म स्वीकारला, त्यांचा काहीच अभ्युदय झाला नाही, असे या टीकाकारांना म्हणावयाचे