५१८ Si. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे काय ? व हे म्हणणे जर सत्य नसेल, धर्मातराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही, असे म्हणणे किती यथार्थ होईल याचा त्यांनी अवश्य विचार करावा. धर्मातराने काही होणार नाही, या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म ही अगदी कुचकामाची वस्तू आहे, असाच निघू शकतो. धर्म ही कुचकामाची वस्तू आहे, तिच्यापासून काही लाभ नाही, हानी नाही, असे ज्यांचे म्हणणे आहे त्यांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच राहिले पाहिजे, असा आग्रह का धरावा हे मला समजत नाही. त्यांना धर्मात काही अर्थ नाही असे Ged तर कोणता धर्म सोडला आणि कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वितंडवाद का करावा ? नुसत्या
IRM काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या
स्वराज्यापासून काय होणार असा प्रश्न करणे गैर नाही. हिंदुस्थानामधील लोकांना देखील अस्पृश्य लोकांप्रमाणेच आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे जर खरे आहे तर नुसत्या स्वराज्याचा काय उपयोग ? आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मातरापासूनही अस्पृश्यांचा फायदा झालाच पाहिजे. खोल विचारांती सर्वास मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्त्व अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोहोंचा अंतिम हेतू एकच आहे. त्यांच्या अंतीम हेतूत कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तो अंतीम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्यमात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही.
आधी उन्नती की आधी धर्मातर ?
या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मातर या प्रश्नाचाही विचार करणे मला आवश्यक वाटते. आर्थिक उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाही. आधी धर्मांतर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मांतर हा वाद आधी राजकीय उन्नती की आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे. समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ती सर्वच साधने आपापल्या परी आवश्यक असतात. त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करावयाचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर करावयाचा असा अनुक्रम नेहमीच ठेवता येणार नाही. परंतु असा अनुक्रम