मुक्ती कोन पथे ? ५१९
ठेवावा असाच जर आग्रह असेल तर आधी धर्मांतर किंवा आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मातर असेच मी म्हणेन. जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार, हे मला समजत नाही. दुकानदारी करण्याच्या हेतूने तुम्हापैकी कोणी जर एखादे दुकान घातले व दुकानदार अस्पृश्य आहे असे कळले तर त्याच्यापासून कोणीही माल घेणार नाही. नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने जर तुम्हापैकी कोणी एकाने नोकरीकरीता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असे समजले तर त्याला नोकरी मिळणार नाही. कोणाची शेती विकायची झाली व तुम्हापैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे म्हणून समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकणार नाही. आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी अस्पृश्यतेमुळे कोणत्याही मार्गात तुम्हाला यशप्राप्ती होणार नाही. अस्पृश्यता ही एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोंड आहे. ती सरकविल्याशिवाय तुमचा मार्ग सुकर होऊ शकत नाही व धर्मांतर केल्याशिवाय ही धोंड नाहीशी व्हायची नाही. तुमच्यातील काही तरूण लोक आज शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरिता जिकडून पैसा मिळेल तिकडून पैसा मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या पैशाच्या लालचीमुळे कित्येकांच्या मनात आहोत तेथेच, अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते. परंतु अशा तरूणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुरूप नोकरी मिळविण्याचा मार्ग जर खुला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात ? आपल्यातील शिकलेल्यांपैकी पुष्कळसे लोक बेकार आहेत. त्याचे कारण काय ? माझ्या मते या बेकारीचे कारण पुष्कळ अंशानी अस्पृश्यता हेच आहे. अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांची चहा होऊ शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे चीज होऊ शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून काढून टाकण्यात आले. अस्पृश्यतेमुळे तुम्हाला पोलिसात घेत नाहीत. अस्पृश्यतेमुळे तुम्ही पट्टेवाल्याची जागा मिळवू शकत नाही. अस्यृश्यतेमुळेच तुम्ही कोणी वरच्या जागेला चढू शकत नाही. अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे. त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राखरांगोळी झाली आहे. अशा स्थितीत तुम्ही गुण संपादन ते काय करणार ? व केले तरी त्याचा काय उपयोग होणार ? तुमच्या गुणाचे काही चीज व्हावे, लुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा, तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावीत, अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालविली
पाहिजे. `