५२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
धर्मांतराविरूद्ध काही शंका
येथवर धर्मांतर विरोधकांनी जी कारणे पुढे केलेली आहेत त्या कारणांचा विचार केला आहे. आता धर्मातराविषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका प्रदर्शित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल, असा बऱ्याचशा महार लोकांना बाऊ वाटत आहे, असे माझ्या कानी आले आहे. वरिष्ठ जातीतील धर्मांतर विरोधी लोकांनी तुम्ही धर्मातर केले तर तुमच्या महारक्या जातील, अशी भीती गावोगावी महार लोकांना घातल्याचे माझ्या कानी आले आहे. महारकी गेली तर मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही, ही गोष्ट तुम्हा सर्वांना माहीत आहे. महारांना अधोगतीस नेणारी जर कोणती एखादी बाब असेल तर ती महारकी होय. हे माझे मत गेल्या दहा वर्षांपासून लोकांपुढे मी मांडीत आलो आहे आणि ज्या दिवशी या महारकीच्या बेडीतून तुमची सुटका होईल त्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला, असे मी समजेन. परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांना मी एवढे आश्वासन देऊ शकतो की धर्मातरामुळे महारकी वतनाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू शकत नाही. या बाबतीत सन १८५० सालच्या कायद्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाच्या, केवळ त्याने धर्मांतर केले एवढ्याच कारणामुळे, वारसाच्या अगर मालमत्तेच्या कोणत्याही अधिकारास बाधा येऊ शकत नाही. ज्यांना कायद्याचा आधार पुरेसा वाटत नसेल त्यांनी नगर जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घ्यावी. नगर जिल्हयातील पुष्कळ महार खिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे खिस्ती आहेत व काही महारच राहिले आहेत. तथापि, जे खिस्ती झाले आहेत त्यांचा वतनावरचा हक्क नाहीसा झाला नाही. याचा दाखला नगरचे महार तुम्हा सर्वांना देऊ शकतील. तेव्हा धर्मांतरापासून महारकी वतनाला धोका येणार आहे, अशी भीती कोणीही बाळगू नये.
दुसरी शंका राजकीय हक्कांसंबंधी आहे. धर्मातर केले तर आमच्या हक्कांचे काय होईल, अशीही शंका पुष्कळ लोकांकडून प्रदर्शित करण्यात येते. अस्पृश्य वर्गाला मिळालेल्या राजकीय हक्काचे महत्त्व मी ओळखीत नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. हे राजकीय हक्क मिळविण्याकरिता जेवढी दगदग व जेवढी पराकाष्ठा मी केली, तेवढी दगदग व तेवढी पराकाष्ठा इतर कोणीही केलेली नाही. तथापि, राजकीय हक्कांवरतीच सर्वस्वी भर देणे योग्य होणार नाही असे मला वाटते. जे राजकीय हक्क दिलेले आहेत ते काही यावच्चंद्रदिवाकरौ अशा