५२२ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिंदू लोकांनी अस्पृश्यता मानू नये व मानल्यास तो गुन्हा आहे, असा एक कायदा , पास केला व तसा कायदा पास केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाहीत, फार तर तुम्ही गरीब व दरिद्री आहात, तुमच्याप्रमाणे इतर जातीही दरिद्री आहेत, परंतु अशा दरिद्री जातींना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत. मग तुम्हाला का द्यावेत ? या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा लुम्ही पूर्णपणे विचार करावयास पाहिजे. मुसलमान लोकांना, खिस्ती लोकांना याचे उत्तर सहज देता येण्यासारखे आहे. आमचा समाज दरिद्री आहे, अज्ञानी आहे, मागासलेला आहे, म्हणून आम्हास स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आले आहेत असे नसून, आमचा घर्म निराळा आहे, आमचा समाज निराळा आहे आणि जोपर्यंत आमचा धर्म निराळा आहे, तोपर्यंत राजकीय हक्काचा वाटा आम्हास मिळाला पाहिजे, असे समर्पक उत्तर ते देऊ शकतील. तुमचा समाज निराळा, . म्हणून तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी ही भूमिका तुम्हाला घेता येईल तोपर्यंत ती घेता येणार नाही आणि जोपर्यंत अशा स्वतंत्र भूमिकेवर उभे राहून राजकीय हक्काची मागणी तुम्ही करू शकत नाही तोपर्यंत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत, त्यास धोका नाही, असे समजून चालणे अत्यंत अज्ञानीपणाचे लक्षण आहे, असे मला वाटते. या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे, असेच म्हटले पाहिजे.
तुम्ही हिंदू धर्मात राहिलेत तर तुमचे राजकीय हक्क जातील. तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यावयाचे नसतील तर धर्मांतर करा, धर्मातरानेच ते कायम राहणार आहेत.
समारोप
मी माझा निश्चय करून टाकलेला आहे. मी धर्मातर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ती प्राप्तं करून घेता येणार नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही. हिंदू धर्म माझ्या . स्वाभिमानाला रूचू शकत नाही. तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरिता देखील धर्मातर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐहिक