मुक्ती कोन पथे ? ५२३
लाभाकरिता धर्मातर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अशा लोकांना मूर्ख म्हणण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावरती आत्म्याचे काय होईल व काय न होईल, हे सांगणारा धर्म श्रीमंतांच्या उपयोगाचा असेल. फावल्या वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन करता येईल. जिवंतपणी ज्यांनी सौख्य भोगले त्यांना आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिकच आहे. पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राखरांगोळी झाली आहे, जे अन्नवस्त्राला मोताद झाले आहेत, ज्यांची माणुसकी नाहीशी झाली आहे, त्या लोकांनी धर्माचा ऐहिकदृष्ट्या विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहात राहावे ? या गर्भश्रीमंत रिकामटेकड्यांच्या वेदांताचा गोरगरीबाला काय उपयोग ?
धर्म माणसाकरता आहे
मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा, संघटना करावयाची असेल तर धर्मातर करा. सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा. जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहाता ? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेवू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहाता ? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहाता ? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहाता ? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहाता ? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहाता ? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ! ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसांचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.