३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 568

५२४ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

धर्मांतराच्या बाबतीत जे जे काही प्रश्‍न उद्‌भवतात त्या त्या प्रश्‍नांचा मी यथामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्‍नावरील माझे विवेचन कदाचित पाल्हाळिक झाले असेल, परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूर्वीपासून ठरविले होते. धर्मांतराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय धर्मांतर करू नये, असे माझे मत आहे आणि त्यामुळे कोणाचीही | वृत्ती साशंक राहू नये व कोणाच्याही मनात fee, राहू नये एवढ्याकरिता इतक्या सविस्तरपणे या प्रश्‍नाचा विचार मला करावा लागला आहे. माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही, परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी मला आशा आहे. रूचेल ते बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळविणे हे व्यावहारिक माणसाला शोभते, पण ते पुढाऱर्‍्याला शोभणार नाही, असे माझे मत आहे. लोकांचे भले कशात आहे व वाईट कशात आहे हे जो निर्भयपणे व निभिडपणे लोकोपवादाची पर्वा न करता मांडतो त्यालाच मी पुढारी मानतो. तुमचे हित कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्यकर्म आहे. ते तुम्हाला रूचले नाही तरी ते सांगणे मला भाग आहे. माझे कर्तव्यकर्म मी केले आहे. आता माझ्या प्रश्‍नाचा निर्णय करणे हे कर्तव्यकर्म तुमचे. धर्मांतराच्या प्रश्‍नाचे मी मुद्दाम दोन विभाग केले आहेत. हिंदू धर्माचा त्याग करावयाचा की हिंदू धर्मातच राहावयाचे हा त्याचा एक भाग आहे. त्याग करावयाचा झाल्यास कोणत्या धर्माचा स्वीकार करावयाचा किंवा नवीन धर्माची उभारणी करावयाची हा त्या प्रश्‍नाचा दुसरा विभाग आहे. मला फक्त आज पहिल्या प्रश्‍नाचा निर्णय करावयाचा आहे, तो झाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्‍नाचा विचार करण्यात अगर त्या बाबतीत तयारी करण्यात काही अर्थ नाही. तेव्हा पहिल्या प्रश्‍नावर जे काही ठरवायचे आहे ते ठरवा. तुम्हाला ते ठरविण्याकरिता दुसरी संधी मला देता येणार नाही. आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम

A ठरवीन. तुम्ही जर धर्मांतराच्या विरूद्ध निर्णय केला तर प्रश्‍नच

मिटला. माझ्या स्वत:करिता जे मला करावयाचे असेल ते मग मी करीन. तुम्ही धर्मांतराच्या apa निर्णय जर केलात तर त्याबरोबरच तुम्ही सर्वांनी संघटित रूपाने धर्मांतर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे. धर्मांतराचा निश्चय झाला तेव्हा वाटेल त्याने वाटेल त्या धर्मात जावे अशा प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मातराच्या कार्यात पडणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे. ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नतीप्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतील ते कष्ट व ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे. परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले