मुक्ती कोन पथे ? ५२५
पाहिजे, या भावनेला वश होऊन काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या. माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दलही मला काही दु:ख होणार नाही. उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल. हा निर्वाणीचा प्रसंग आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवालच. तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे. तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय जर केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल. तुम्ही आज पराधिन राहण्याचा निश्चय केला तर भावी पिढीसुद्धा पराधिन राहील, म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे.
स्वयंप्रकाशित व्हा
याप्रसंगी तुम्हास काय सांगावे, याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षु संघास परिनिर्वाणाच्या पूर्वी जो उपदेश केला व ज्याचा ' महापरिनिर्वाण सुत्ता त उल्लेख केलेला आहे त्याची मला आठवण होते. एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यांना अभिवादन करून एके बाजूस बसला आणि म्हणाला, “ भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना पाहिले आहे. भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे, मला धर्मही सुचत नाही, परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की, भिक्षु संघाविषयी काही तरी सांगितल्याशिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हायचे नाही. भगवान बुद्धानी उत्तर दिले,
आनंदा ! भिक्षू संघास मजपासून काय हवे आहे ? आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यसूप्ति मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तथागत भिक्षूविषयी काय सांगणार ? तेव्हा आनंदा, तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा! पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका ! स्वतःवरच विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणाच्या अंकीत होऊ नका ! सत्याला धरून राहा! सत्याचाच आश्रय करा ! व दुसऱ्या कोणाला शरण जावू नका ! “ मी देखील बुद्धाच्याच शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा! तुम्हीच स्वतःच्या बुद्धीला शरण जा ! दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका ! दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका! " सत्याचा आधार घ्या! सत्यास शरण जा! दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका ! “ हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही. ' *
७ ७ ७
१ जनता : २७ जून १९३६.