५२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
या नव्या धर्माच्या शिक्षणार्थ आपले प्रचारक त्या नव्या धर्माचे शिक्षण घेऊन अस्पृश्य समाजाला नव्या धर्माची ओळख व शिकवण देण्यासाठी आपले प्रचारक देण्यास तयार आहेत.
मांडणार :--पतितपावन बुवा. अनुमोदन-दिगंबरनाथ नागनाथ कांबळे."
वरील ठरावावर प्रमुख मंडळींची भाषणे झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषण करण्यास विनंती करण्यात आली. ते आपल्या भाषणात म्हणाले,
संत मंडळी आणि बंधु भगिनींनो,
मी जरी स्वतः साधु नसलो, तरी माझे घराणे साधुचे आहे. माझ्या घराण्यामध्ये जवळजवळ तीन पिढ्यापर्यंत मोठी माणसे साधु होऊन गेली. माझ्या आयुष्यातील बराचसा भाग संत समागमात गेलेला आहे. साधुंच्या हातून आपल्याला पुष्कळशी कामगिरी करून घेता येईल असे मला वाटते व त्या सर्वांचा विचार करण्यासाठी आज ही संत परिषद बोलाविण्यात आली आहे.
आपल्यातील संत लोकांनी एक मोठी कामगिरी केली आहे. हिंदू धर्मात शूद्र लोकांना विद्या मिळण्याचा अधिकार नव्हता. एवढेच नव्हे तर तुम्ही मनुस्मृती चाळली, तर तीत तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल की, त्या मनुस्मृतीत जो कोणी शूद्र वेदाध्ययन करील, त्याची जीभ कापून टाकावी, त्याच्या कानात गरम शिशाचा रस ओतावा, असे उल्लेख आढळतात. या संत समाजाने अस्पृश्य वर्गाला ज्ञान देण्याचे महत्त्कार्य केले. त्यांनी केलेले श्रम व सोसलेला छळ अवर्णनीय आहे. शूद्रांनी ज्ञान संपादन करू नये, यासाठी हिंदू धर्माने केलेल्या कडेकोट बंदोबस्तातून व कोंडमाऱयातून या लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ज्ञानलालसा फारच मोठी होती. याच समाजाने काही धार्मिक ग्रंथ असे लिहिले आहेत की, तसे ग्रंथ मिळणे आज कठीण जाईल. आज अनेक अस्पृश्य संतांजवळ कित्येक हस्तलिखित पुरातन ग्रंथ आहेत, तसे हिंदू धर्माच्या अभिमान्यांजवळही नसतील. या संत समाजाने अस्पृश्यांना जे ज्ञान दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.
आज संत समाजाची परिस्थिती काय आहे ? ज्या लोकांनी हा जो संतपणा
स्वीकारला त्याचा त्यांना काय फायदा झाला आहे? त्यांनी आजवर काय कमावले ? त्यांच्या ईश्वरभक्तीने व ज्ञानप्राप्तीने त्यांची अस्पृश्यता नष्ट झाली काय ? त्यांच्यावर लादलेला अस्पृश्यतेचा कलंक कधीच धुतला गेला नाही. संत महार तो महारच राहिला. महार संत कितीही विद्वान असला, तो मोठा धर्मवेत्ता असला, तरी तो ब्राह्मणाचा गुरु होऊ शकत नाही. अशा तर्हेची वचने हिंदू धर्माच्या शिलेदारांनी लिहून ठेवलेली आहेत.
१ जनता : ४ जुलै १९३६.