१-६-१९३६ कायदे मंडळावर पक्षाचा लायक उमेदवारच निवडून आणा - Page 578

५३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मिळविण्याच्या बाबतीत जे लोक इंग्लंडच्या पार्लमेंटबरोबर लढत होते त्यात चार्लस्‌ जेम्स फॉक्स हा जहाल गणल्या गेलेल्या राजकीय पक्षाचा पुढारी होता. या पक्षाने नागरिकांना माणसागणिक मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी जोराचा प्रयत्न केला. त्यावेळी पार्लमेंटमध्ये धनिक लोकांचे प्रावल्य होते. त्या धनिक लोकांच्या पार्लमेंटबरोबर चार्लस्‌ जेम्स फॉक्स हा व त्याचे अनुयायी निकराने भांडत असत. परंतु त्यांना त्यात अपयश आले. शेवटी अखेरचा उपाय म्हणून त्याने व त्याच्या पक्षाने पार्लमेंटबरोबर असहकार केला. हिंदुस्थानात ज्याप्रमाणे महात्मा गांधींची नौनकोऑपरेशनची चळवळ चालली होती त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये ही असहकारतेची चळवळ त्यावेळी जोरात होती. या जहाल पक्षाची अधिष्ठात्री एक लेडी पार्टलँड या नावाची एक बाई होती. या बाईला जेव्हा चार्लस्‌ जेम्स फॉक्स याने पार्लमेंटमधून वॉकआऊट केले असे समजले तेव्हा तिने आपल्या घरी त्यास चहापार्टीस बोलाविले. जेव्हा फॉक्स व त्याची सहकारी मंडळी या बाईच्या घरी आली तेव्हा ते आपआपसात आपल्या असहकारीतेची प्रौढी मिरवू लागले. त्या बाईने त्यांना सवाल केला तो फार महत्त्वाचा असल्यामुळे तो मी आपणाला सांगत आहे. ती बाई म्हणाली : " मि. फॉक्स, जर तुमच्या असहकारितेमुळे तुमचा शत्रू चीत होत असेल तर तुमचा असहकारितेचा मार्ग ठीक आहे. पण तसे जर नसेल तर या असहकारात काही अर्थ नाही. तुम्ही प्रतिपक्षाशी दोन हात करण्याचे सोडून अपयश आले म्हणून रडतरावाप्रमाणे रडत बसला आणि भागूबाईप्रमाणे रणमैदान सोडून पळून गेलात तर आपला शत्रू आपल्यावर विजय मिळविल्याशिवाय खचित राहणार नाही आणि म्हणून रणांगणामधून निघून जाणे हे शुद्ध मूर्खपणाचे आहे.” ही टीका काँग्रेसच्या लोकांना लागू पडते, असे मला वाटते.

आपल्याला मिळालेल्या राजकीय सुधारणा जरी अपुऱ्या असल्या तरी त्या राबवून घेऊन झिडकारून न देता त्यांच्याच जोरावर आणखी आपल्याला पुष्कळ प्राप्त करून घेता येईल. या मिळालेल्या राजकीय सुधारणांन्वये आपल्याला पुष्कळशा गोष्टी करून घेता येतील. कोणतीही गोष्ट कायदा झाल्याशिवाय घडून येत नाही. म्हणून त्याच्याकरिता कायदाच झाला पाहिजे. निदान अस्पृश्य समाजाचे भवितव्य मुख्यतः कायद्यावर अवलंबून राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला या राजकीय सुधारणा स्वीकारणे आवश्यकच आहे.

आपली सामाजिक सुधारणा कायदे करून होणार नाही. परंतु आपली आर्थिक, शैक्षणिक व औद्योगिक उन्नती कायद्याने करून घेता येईल. त्यांच्यावरच तुम्हाला अवलंबून राहिले पाहिजे. आपल्या उन्नतीचे कायदे कसे घडून येतील हे आपण कायदेमंडळात ज्या लायकीचे सभासद निवडून देणार आहोत त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. आपण जे प्रतिनिधी निवडून देऊ ते आपल्या समाजहिताला जाग"॥र आहेत किंवा नाहीत, हे पाहिले पाहिजे. जे आपल्या समाजहिताच्या दृष्टीने कायदेमंडळात कायदे घडवून आणतील अशाच लोकांना