१-६-१९३६ कायदे मंडळावर पक्षाचा लायक उमेदवारच निवडून आणा - Page 579

कायदे मंडळावर पक्षाचा लायक ..... निवडून आणा ५३५

तुम्ही निवडून द्या. आतापर्यंत आपल्याला इंग्रज सरकारकडे दाद मागावी लागत असे, पण या नव्या राज्यघटनेनुरूप इंग्रज सरकारचे हातात काही राहिले नाही.

तुम्ही जे प्रतिनिधी कायदे कौन्सिलात पाठवाल त्यांच्यावरच तुम्हाला अवलंबून राहिले पाहिजे. तुम्हाला ज्या काही अडचणी भासतील त्या नाहीशा करण्याकरता त्यांना तुम्ही भाग पाडले पाहिजे. नुसते प्रतिनिधी कायदे कौन्सिलात पाठवून तुमचे भागणार नाही. निवडून गेल्यानंतर ते काय करतात यावर देखील तुम्ही नजर ठेवली पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही जो मनुष्य कायदे- मंडळात निवडून द्याल तो लायक असला पाहिजे. तुम्ही भोळे लोक आहात. एक म्हणेल : हा माझ्या गावचा यशा महार, दुसरा म्हणेल : हा माझ्या गावचा रामा महार, तिसरा म्हणेल माझा शंकर महार निवडून आला पाहिजे. असा अभिमान तुम्हाला का असावा ? कायदे मंडळात तुमचे हित कोण करू शकेल हेच तुम्ही मुख्यतः पाहिले पाहिजे. विनाकारण गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा अभिमान धरून बसू नका.

_ जर तुम्ही उमेदवार निवडून देतेवेळी दक्षता बाळगली नाही तर तुमच्या सर्व कार्याचाच नाश होणार आहे. दुसरी गोष्ट मला आपणास सांगितली पाहिजे ती ही की एकटा मनुष्य कायदेमंडळात काही करू शकत नाही. मी १९२६ a सालापासून मुंबई कायदेमंडळात आहे. मला थोडे बहुत ज्ञानही आहे. पण समाजहिताच्या दृष्टीने मला कोणतेच कार्य करता आले नाही. याचे कारण आम्ही दोन माणसे-मी व डॉ. सोळंकी असे-कायदेमंडळात आहोत. एकटा-दुकटा मनुष्य कायदेमंडळात काही करू शकत नाही. एकजुटीने, संघटितपणाने तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी वागतात किंवा. नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. पक्षाला न घरून वागणाऱ्या माणसाला निवडून दिल्यास काही हित होणार नाही. नुसता हुशार आहे एवढे बघून चालणार नाही. त्याला पक्ष आहे किंवा नाही हेही तुम्ही पाहिले पाहिजे.

आपल्या सुदैवाने आपणाला पंधरा जागा प्राप्त झाल्या आहेत. परंतु ज्या पंधरा जागा आपणाला मिळाल्या आहेत ते पंधरा प्रतिनिधी एकजुटीने राहिले नाहीत तर त्या जागांचा दुरुपयोग झाल्यासारखेच होईल. म्हणून आपण निवडून दिलेले सभासद कायदेमंडळात एकजुटीने कसे राहतील याबद्दल आपल्याला योजना तयार करावयास पाहिजे आणि ती योजना अशा प्रकारची असली पाहिजे की जेणेकरून हे पंधरा सभासद पाच वर्षे एकदिलाने कायदेकौन्सिलात राहून आपल्या समाजहिताकडे दुर्लक्ष करणार नाहीत. ज्या ज्या जिल्ह्यात आपल्याकरिता जागा राखल्या आहेत त्या त्या जिल्ह्यात दहा लोकांची एक कमिटी स्थापण्यात यावी. अशा निरनिराळ्या जिल्ह्यात कमिट्या स्थापून झाल्या म्हणजे या सर्व लोकांमधून जे जे लोक लायक असतील त्या सर्वांचे एक मध्यवर्ती मंडळ