५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 58

१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पर्श लेखावे हे नवल नव्हे काय ? पण याहूनही चीड येण्यासारखी जी दुसरी गोष्ट आहे ती ही की, जे लोक हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत नाहीत त्यांना मात्र आमचे वरिष्ठ हिंदू समदृष्टीने लेखतात. खिश्चन लोक अपवित्रही नाहीत व अस्पृश्यही नाहीत. वरिष्ठ हिंदूंना त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत नाही व त्यांच्या हाताखाली राबण्यात कमीपणा वाटत नाही. तसेच, एका दृष्टीने मुसलमान लोक हिंदूतील कोणत्याही अती नीच वर्गापेक्षा विशेष अस्पृश्य व अपवित्र आहेत असे म्हणणे भाग आहे. कारण कोणताही हिंदू गोवध करून त्या मांसावर उपजीविका करीत नाही. मुसलमानास व खिश्चन लोकास तसे करण्यास मात्र प्रत्यवाय नसून महार, मांग, धेड वगैरे हिंदुंपेक्षा त्यांना पवित्र व स्पर्श मानण्यात येते. त्यांचा व वरिष्ठ हिंदूंचा हर एक प्रकारचा बाह्य व्यवहार घडतो व त्यांची मुले एका शाळेत व एका वर्गात शिकतात. ते एका रस्त्यानें जातात-येतात. एका विहिरीवर पाणी भरतात व इतर बाबतीत समान वृत्तीने वागतात. परंतु ज्या आम्हास वैदिक धर्म शिरसावंद्य, आमचा विचार-आचार हिंदू, त्यांचा ते तिरस्कार करतात. इतकेच नव्हे तर ते आम्हाला जनावरांपेक्षाही कमी लेखतात.

ज्या धर्माची तत्त्वे इतकी उच्च पण त्याचा व्यवहार इतका नीच त्या धर्मात राहून आमची उन्नती होईल की नाही असा प्रश्‍न साहजिकच उद्‌भवतो. परंतु आपल्या लोकांनी धर्मातर करावे की नाही या प्रश्‍नाचे उत्तर देणे कठीण आहे. धर्म हा मनुष्यास आवश्यक आहे की नाही या वादग्रस्त प्रश्‍नात जाण्याची माझी इच्छा नाही. एवढे मात्र खरे की, काही लोकांना आणि विशेषतः हिंदू लोकांना जर प्राणाहून काही प्रिय असेल तर तो धर्मच आहे; पण ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही, तो धर्म काय कामाचा ? जो धर्म त्याच्या अनुयायांना ऐहिक व पारलौकिक सुखाची द्वारे मोकळी करण्याऐवजी ती बंद करूनच त्यांना अधोगतीत खितपत पडावयास लावतो त्या धर्माला चिकटून राहण्यात काय अर्थ आहे ? उलट धर्मातर केल्याबरोबर जर तेच लोक आपली माणसात मोजदाद करून आपल्याला समानतेने वागवितात तर धर्मांतर का करू नये हे मला कळत नाही. आज वैकोम येथील सत्त्याग्रहाचीच गोष्ट घ्या. ज्या रस्त्यावरून अस्पृश्य वर्गास जाण्याची मनाई आहे, त्या रस्त्यावरून खिश्चन, मुसलमान व इतर अ-हिंदू जातीस जाण्यास मोकळीक आहे. या पक्षपाताचे कारण विचारले असता धडधडीत असे सांगण्यात येते की, अस्पृश्य हे हिंदू आहेत म्हणूनच त्यास .या रस्त्यावरून जाण्याची मनाई आहे. असा जर हिंदुंचा नियम आहे तर, आपण आज धर्म त्याग व धर्मांतर करून आपली सुटका का-करून घेऊ नये ? माझी खात्री आहे की, जर आपण आज धर्म त्याग केला आणि केलाच आहे तर त्या ऐवजी माझ्या मते महंमदी धर्म स्वीकारणे बरे. जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात, तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहो तसे बहिष्कृत