समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य वुद्धीने झटले पाहिजे १७
असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आफ्न उन्नती करून घेऊ.
देशांतर व धर्मांतर याशिवाय नामांतर हा एक अस्पृश्यता निवारणार्थ नवीन उपाय सांगण्यात येत आहे. अलिकडे अस्पृश्यांनी आदिहिंदू म्हणवून घ्यावे असे सुचविण्यात येत आहे. या बाबतीत मतभेद व्हावयाचे कारण आपणास कोणते नाम अधिक शोभते हे आहे. हा बऱ्याच अंशी हौसेचा प्रश्न आहे. तेव्हा हा प्रश्न वादविवादाने सोडविला जाईल असे काही सर्वस्वी म्हणता येणार नाही. असे जरी आहे तरी या नावाच्या प्रश्नात काही नाही, असे म्हणून चालावयाचे नाही. इतकेच नव्हे तर नावात सारे सार आहे, असे म्हटल्याने मुळीच अतिशयोक्ती होत नाही, असे माझे मत आहे. याला अनेक कारणे आहेत.
अस्पृश्यात जातीभेद यासंबंधी जे वादविवाद होतात, त्यात जातीभेद व अस्पृश्यताही शाखात्मक आहे, असे गृहीत धरले जाते व तद्नुसार रोटी-बेटी व्यवहारादी उपाय शाखात्मक आहेत म्हणून लोक पाळतात. या म्हणण्यात जर काही तथ्यांश असेल तर कायद्याने हिंदूतील जातीस रोटी-बेटी व्यवहारांची मोकळीक दिली तर ती त्यांनी अंमलात आणण्यास आपली तयारी दाखविली पाहिजे, पण वस्तुतः पाहता लोक तशा प्रकारची तयारी दाखवत नाहीत हे निर्विवाद आहे. परस्परात बेटी व्यवहार करण्याचा कायदा पास होऊन आज ३ वर्षे झाली. पण त्या कायद्याचा फायदा घेतल्याचे फारसे ऐकिवात येत नाही. याचे खरे कारण माझ्या मते असे आहे की जातीभेद व अस्पृश्यता ही शाखात्मक नसून भावनात्मक आहेत. म्हणून ती जर आपणास घालवावयाची असतील तर आपण शाखावर प्रहार न करता नावाचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. ही भावना आपणास कशी नष्ट करता येईल याचा मी अनेकवार विचार केला आहे. विचारांती माझे असे ठाम मत झाले आहे की, अस्पृश्यता व जातीभेद ही काय ती नावात साठविलेली आहेत. वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करतात. ते केवळ आपल्या नावामुळेच. महार म्हटला की, ऐकणाऱ्याच्या मनात अमुक एक प्रकारची तिरस्कारमय भावना उभी राहते, मराठा म्हटला की निराळी भावना उत्पन्न होते व तोच ब्राह्मण म्हटला की आदरात्मक भावनेने ऐकणारा प्रेरित होतो. ही गोष्ट कोणासच खोटी आहे म्हणून म्हणता येणार नाही. याची उदाहरणे धेड लोकांना देता येतील. गुजरातेतील धेड लोकांना अस्पृश्यता किती प्रखर रितीने भासते हे काही सांगावयास नको. तरी पण मुंबईत ते आले म्हणजे दक्षिणी मराठ्याच्या शेजारी राहतात. इतकेच नव्हे तर त्यांचा त्यांचा रोटी व्यवहार झालेला मी पाहिला आहे.