२-६-१९३६ धर्मातराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे - Page 586

५४२ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

प्रकारचा संबंध ठेवावयाचा नाही असे जर त्यांनी मनात धरले तर ते मांगांचे व चांभारांचे पुष्कळ नुकसान करू शकतील. अस्पृश्यांमध्ये महार ही बहुसंख्यांक जात आहे. त्यांच्याशिवाय अस्पृश्यांची कोणत्याही प्रकारची चळवळ तसेच अस्पृश्यांचे राजकारण त्यांच्या मदतीशिवाय wea होणार नाही. महारांच्या सहाय्याशिवाय मांग व चांभार काही करू असे म्हणत असतील तर ती त्यांची गैरसमजूत आहे हे त्यांना कळून येण्यास उशीर लागणार नाही. परंतु कोणी वासरू मारले म्हणून आपण गाय मारावी ही गोष्ट जशी न्याय्य होऊ शकत नाही, तसेच मांग व चांभार हे दुराभिमानाने पीडित होऊन महाराशी संबंध ठेवणार नाहीत असे म्हणू लागले म्हणून महारांनी त्यांच्याशी संबंध ठेवू नये हे म्हणणे मला स्वतःला पसंत नाही आणि तशाप्रकारची शिकवण मी महार समाजाला दिलेली आहे. महार लोकांना जाती अभिमान धरावयाचा नाही किंवा मांगापेक्षा किंवा चांभारापेक्षा श्रेष्ठ म्हणवून घ्यावयाचे नाही, त्यांना आपली तशीच सर्व अस्पृश्यांची संघटना करावयाची आहे आणि म्हणूनच महार लोक खोट्या अभिमानाला वळी न पडता सर्व अस्पृश्य लोकांना कवटाळून चळवळ करू इच्छित आहेत. महार लोक जातीभेद पाळीत नाहीत असे ते नुसते तोंडाने म्हणत आहेत असा आरोप कोणालाही करता येणार नाही. ते ही गोष्ट कृतीत उतरवीत आहेत, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. पुण्याला एक अस्पृश्य वसतिगृह आहे ही गोष्ट तुम्हापैकी काही जणांना माहीत असेल. हे वसतिगृह सरकारमार्फत चाललेले आहे. त्यात महार, मांग, चांभार वगैरे अस्पृश्य जातींची मुले आहेत. तेथे पूर्वी एकच स्वयंपाकी सर्व मुलांचे जेवण करण्याकरिता ठेवण्यात आला होता व सर्व मुले एकाच पंगतीस बसून जेवत असत. काही काळाने चांभार पुढाऱ्यांनी चांभार मुलांना फूस दिली की, तुम्ही महार-मांगाच्या बरोबर जेवू नये व त्यांच्या हातचे अन्न खाऊ नये. त्याचा परिणाम असा झाला की, या विद्यार्थी वसतिगृहात महार, मांग, चांभार वगैरे जातींच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे वितुष्ट माजले व महार मुलेही आपणही कोणाच्याच हातचे खाणार नाही म्हणून आम्हालाही आमच्या जातीचा स्वतंत्र स्वयंपाकी पाहिजे, असा आग्रह धरू लागली.

हे वितुष्ट इतके वाढले की, मला स्वतः मुंबईहून पुण्यास जावे लागले व तेथे जाऊन मी महार मुलांची समजूत करून चांभार मूर्ख झाले तर महारांनी मूर्ख का व्हावे ? असा प्रश्‍न केला. चांभार जरी मांगाशी जेवत नसले तरी तुम्ही व मांग एकत्र जेवावे असा सल्ला दिला. मला जर जाती अभिमान असता तर महारांच्या मुलांना, चांभार व मांग तुमच्याशी जेवत नाहीत तर तुम्हीदेखील त्यांच्याशी जेवू नका असा सल्ला मला देता आला असता, पण मी तसा सल्ला दिला नाही. मी स्वतः सोलापूरला एक बोर्डिंग काढलेले होते. त्याला महार जातीशिवाय दुसऱ्या जातीची मदत नव्हती. तथापि, त्यात सर्व अस्पृश्य जातीतील मुले घेण्यात