धर्मातराने अस्पृश्यांना ....... प्राप्त होणार आहे ५४३
येत होती. मांग होते, चांभार, महार, ढोर व भंगीही होते. बरेच दिवसपर्यंत सर्व मुले एकाच पंगतीला बसून एकाच स्वयंपाक्याने केलेले अन्न खात असत. परंतु काही दिवसांनी चांभार-ढोरांच्या मुलांनी वाद उपरिथत केला व आपणाला चांभार स्वयंपाकीच पाहिजे असे ते म्हणू लागले. तेव्हा मी सांगितले की, सर्वात कनिष्ठ अशी जात जी भंगी जात त्या जातीतला स्वयंपाकी आपण ठेवू म्हणजे कोणालाच तक्रारीला जागा राहणार नाही. त्याला महारांची मुले कबूल झाली, पण बाकीची मुले तयार होईनात. अखेर ते बोडिंग मोडले. परंतु आम्ही तत्त्वापासून ढळलो नाही. ज्या ब्राह्मण लोकांच्या किंवा मराठे लोकांच्या नादाने तुम्ही वागता ते लोक हे करू शकतील काय ? अशाप्रकारचे आश्वासन ते जर तुम्हाला देत असतील तर तुम्ही खुशाल त्यांचेकडे जा. आम्हाला कर्तव्य नाही. मला तुम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की, महार ही ब्राह्मण व मराठे यांच्यापेक्षा हजारोपटीने सुधारलेली जात आहे. जातीभेद मानावयास ते तयार नाहीत, सर्वसमदुःखी लोकांशी सहकार्य करावयास ते तयार आहित. तुम्हाला जर त्यांच्याशी सहकार्य करावयाचे असेल तर त्यांनी तो मार्ग खुला करून ठेवलेला आहे. तुम्ही आमच्यात या. महारांच्या सामर्थ्याचा व संघटनेचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. जे काही राजकीय हक्क अस्पृश्यांना मिळालेले आहेत ते मिळविण्याकरता खटपट कोणी केली ? त्याच्याकरता तुम्ही मांग लोकांनी किंवा चांभार लोकांनी कोणता प्रयत्न केला ? मी निर्भयपणे असे सांगू इच्छितो की, या राजकीय हक्कांकरिता जर कोणी स्वार्थत्याग केला असेल तर तो एका महार जातीनेच केला आहे. परंतु त्याचा फायदा तुम्हा सर्वांना मिळालेला आहे. नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये आज जो अस्पृश्यांचा शिरकाव झालेला आहे, तो कोणाच्या खटपटीमुळे झालेला आहे ? हे ट्रेनिंग स्कूल स्थापन झाल्यापासून त्यात अस्पृश्य जातीचा केव्हाही प्रवेश झाला नव्हता. इतकेच नव्हे तर ज्या जातीचा सामाजिक दर्जा हलका आहे अशा जातींना त्या शाळेत घेऊ नये, असा निर्बंध सरकारने घातला होता. तो निर्बंध काढून टाकण्याकरता कोणत्याही मांग पुढाऱ्याने अगर चांभार पुढाऱ्याने खटपट केलेली नाही. त्यांच्याकरिता मी खटपट केलेली आहे व त्या शाळेचे द्वार अस्पृश्यांना खुले करून दिले आहे, पण या सवलतीचा फायदा कोणाला मिळाला ? या सवलतीचा फायदा महारांना तर मिळाला नाहीच तो फक्त मांगांना व चांभारांना मिळालेला आहे. जे दोन पोलीस इन्स्पेक्टर आज अस्पृश्यांपैकी म्हणून पोलीस खात्यात नोकरी करीत आहेत त्यांपैकी एक मांग आहे, एक चांभार आहे. महारांचे जे उमेदवार होते ते, या दोघांपेक्षाही अनेकपटीने हुशार होते व लायक होतें, परंतु त्यांपैकी, एकालाही घेण्यात आले नाही. उलट