धर्मातराने अस्पृश्यांना .. , . . . . प्राप्त होणार आहे ५४५
नसून साऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्य वतनदारांना देण्यात आलेला आहे. मद्रास, यु. पी. वगैरे सर्व प्रांतातून ज्या अस्पृश्य जातींना वतनदारी आहे त्या त्या जातींना हा लाभ मिळाला आहे. असे असताना फक्त मुंबई इलाख्यात तो लागू करण्यात
आला आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. मी याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न विचारतो की, मुंबई इलाख्यात तरी हा इक्क महारांनाच मिळाला आहे काय ? हा हक्क महारांना मिळालेला नसून वतनदारांना मिळालेला आहे. कानडी भागात महार वतनदार नसून मांग लोक वतनदार आहेत. अर्थात वतनदारीमुळे त्या भागात जो फायदा होणार आहे तो कोणाचा ? मांगांचा का महारांचा ? अशा- रितीने तुम्ही विचार केलात तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की, ज्या लोकांनी हा गिल्ला चालविला आहे ते लोक एकतर अज्ञानी असले पाहिजेत किंवा पाजी असले पाहिजेत. अशा लोकांच्या उपद्व्यापापासून तुम्ही सावध असले पाहिजे असा इशारा तुम्हाला देणे मला आवश्यक वाटते. महारांचे राजकीय वैभव वाढवावे व बाकीच्यांचे कमी करावे अशी जर माझी वृत्ती. असती तर काल महारांच्या राजकीय परिषदेत मी जे भाषण केले ते केले नसते. कालच महारांच्या सभेत मी स्पष्टपणे सांगितले की, येत्या नव्या कायदे कौन्सिलमध्ये ज्या १५ जागा अस्पृश्यांकरिता दिलेल्या आहेत त्यापैकी काही जागा मांग लोकांना दिल्या पाहिजेत. ब्राह्मणेतरात अस्पृश्यांप्रमाणे लहान लहान गट आहेत. अस्पृश्यांप्रमाणेच ब्राह्मणेतरांना देखील सात राखीव जागा दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी एकही जागा ब्राह्मणेतरात ज्या लहानसहान अल्पसंख्यांक जाती आहेत त्यांना आपण देऊ, अशाप्रकारचे आश्वासन एकही मराठा जातीचा पुढारी देऊ शकत नाही. परंतु मी ते आश्वासन तुम्हाला देऊ शकतो इतकेच नव्हे तर त्याप्रमाणे ते आश्वासन कृतीत उतरवण्याचा मी प्रयत्न करीन असेही आश्वासन मी तुम्हास देऊ इच्छितो. जे औदार्य मराठा समाज दाखवू शकत नाही ते औदार्य महार समाज दाखवू शकतो. ही गोष्ट साधी आहे किंवा सोपी आहे असे कोणी म्हणू शकणार नाही.
हे मोठे अवघड व कठीण असे काम आहे. कोणतीही जात झाली तरी तिला स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या प्राप्तीचा काही वाटा दुसऱ्यास देणे हे व्यावहारिकदृष्ट्या लहानसहान काम नव्हे. नुसता प्राप्तीचा वाटा देण्याकरिता महार लोकांची तयारी आहे इतकेच नव्हे तर महार-मांग हा जातीभेद मोडून त्यांची एक जात करण्याकरिता देखील महार जातीची तयारी आहे. ही गोष्ट महार जात धर्मांतर करावयास तयार आहे व तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर धर्मातर करावे असे आग्रहाने ते जे सांगत आहेत यावरून सिद्ध होत आहे. धर्मांतराचे जे काही अनेक हेतू असतील त्यांपैकी अस्पृश्यातील जातीभेद काढून टाकणे हा एक प्रमुख हेतू आहे. सर्व अस्पृश्यांनी धर्मातर केल्याशिवाय