५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 60

१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उलटपक्षी महाराष्ट्रातील कोणताही अस्पृश्य गुजरातेत जर गेला तर दक्षिणी म्हणून ब्राह्मणाच्या खाणावळीत त्याला राहता येते, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. हल्ली दोन-तीन वर्षात सगळी भद्रास मुंबईस पोट भरण्यास उतरली आहे आणि त्यात मद्रासेतील बरेच अस्पृश्य लोकही आहेत; पण हे मद्रासेतील अस्पृश्य मुंबईच्या हिंदुंच्या विश्रांतीगृहात खुशाल खातात पितात. त्यांचा कोणत्याच प्रकारे निषेध नाही. एका भागातील अस्पृश्य दुसऱ्या भागात गेला तर तो स्पृश्य होतो; पण या विलक्षण प्रकाराचे कारण शोधून काढले असता असे दिसून येईल की अस्पृश्यतेच्या खुणा व मुद्रा सर्व भागात एकच नाहीत. एका भागाच्या खुणा दुसऱ्या भागाला अवगत नाहीत. एका प्रांतातील अस्पृश्य दुसऱ्या प्रांतात खुणेच्या अभावी स्पृश्य लेखला जातो. माणूस म्हणून माणूस किंवा जात म्हणून जात अस्पृश्य नाही. अमुक एक नाव धारण करणारे लोक अस्पृश्य गणले जातात. ते नाव ज्यांना नसेल ते स्पृश्य गणले जातील हा समाजाचा ठोकताळा बांधला गेला आहे. नाही तर अस्पृश्य माणसांच्या रचनेत, त्वचेत, रूप-रंगात, स्पृश्य माणसापेक्षा काही निराळे आहे असे नाही, की लगेच पाहिल्याबरोबर ज्या प्रकारे सिद्दी लोकांस युरेपियनांपासून किंवा दोघांसही चिनी जपानींपासून अलग करता येते त्याप्रमाणे अस्पृश्यांना स्पृश्यांपासून निराळे करता येईल. नावाशिवाय अस्पृश्य ओळखण्याची दुसरी खुण मुद्रा काही नाही. म्हणून माझ्या मते नामांतर करणे इष्ट आहे.

येथवर जे नामांतर करा म्हणतात, त्यांचे व माझे एक मत आहे. परंतु मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वर्गाने आदि-हिंदू म्हणवून घ्यावे यात काय हशील आहे ते मला समजत नाही. याने अस्पृश्य वर्गात समावेश होणाऱ्या सर्व जातीचे एकीकरण व्हावे असा जर उद्देश असेल तर ' बहिष्कृत “ हे नाव काय वाईट आहे ? यासारखे दुसरे अर्थपूर्ण व टोपण नाव देता येईल की नाही याची मला शंका वाटते. आदि या नावाने अस्पृश्यता जाईल असा जर या नव्या धोरणाचा हेतू असेल तर तो केवळ भ्रम आहे. महार लोक केव्हा केव्हा लाजेमुळे कोणी कोणी विचारले असता मी चोखा म्हणून सांगतात. तसेच चांभार मी रोहिदास असे म्हणतो; पण एका नावाने ते जितके अस्पृश्य तितकेच दुसऱ्या नावाने ते अस्पृश्य आहेत. मद्रासेत अस्पृश्य वर्ग आदि द्रविड म्हणवून घेतात. परंतु तेणेकरून त्यांची अस्पृश्यता गेल्याची साक्ष कोणी देत नाही. अस्पृश्यता व जातीभेद ही नावात साठविलेली आहेत. हे सर्वस्वी खरे आहे आणि ती नावे लुप्त केल्याखेरीज भागायचे नाही, आम्ही आपली जातीवाचक नावे सोडून फक्त, चालणार नाही तर आमच्याबरोबर सर्व जातीनी आपली जातीवाचक नावे सोडून सर्वानी सर्वसाधारण असे एक नाव धारण केले पाहिजे. माझ्या मते सर्वांनीच फक्त हिंदू असे म्हणावे व जातीवाचक पोटनावे काढून टाकावीत. कोणी स्वतःस