८-१०-१९३६ अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच घात होईल - Page 599

९५
अंघ व स्वार्थी दृष्टी ठेवली तर
सर्व समाजाचाच घात होईल

गुरूवार, तारीख ८ ऑक्टोबर १९३६ रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सकाळच्या गाडीने ६.३० ला जळगाव स्टेशनवर आले. त्यावेळी त्यांच्या स्वागतार्थं पूर्व खानदेशातील प्रमुख मंडळींनी हजर राहून स्वागत केले. स्वागतप्रसंगी अस्पृश्य पुढारी मे. सेनू नारायण मेढे, शामराव कामाजी जाधव, रायला झगा निकम, लक्ष्मण पाहुणा मेढे, धनाजी रामचंद्र बिन्हाडे, मोतीराम रामजी fares, देविदास सोनावणे, नामदेव सोनावणे, ओंकार सोनावणे, दिवाण सीताराम चव्हाण, माछाडे, मि. प्रधान वकील, वानखेडे, बारसे, बहिरूपे, के. एल. तायडे, बडगे, नामदेव भागाजी भालेराव, शिवा रघुनाथ, भास्कर गरबड, वाघ इत्यादि खानदेशातील प्रमुख मंडळी हजर होती. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरल्याबरोबर त्यांचे गगनभेदी जयजयकारात स्वागत करण्यात आले व रा. मेढे यांनी त्यांना पुष्पहार घातला. नंतर आलेल्या मंडळीची विचारपूस करीत मे. कलेक्टरसाहेब (पूर्व खानेदश) यांच्या मोटारीतून मि. बाळासाहेब प्रधान वकील यांच्या छरी गेले. डॉ. बाबासाहेबांना कोर्टाचे काम असल्याने ते ११ वाजता कोर्टात गेले. बाबासाहेब जाऊन पोहचत नाहीत तोच लोकांचे थवेच्याथवे कोर्टाकडे धाव घेऊ लागले. १५-२० मिनिटात सर्व कोर्ट अलोट गर्दीने फुलून जाऊन त्या ठिकाणी एक भली मोठी यात्राच आहे की काय असे भासू लागले. यावेळी कोर्टाच्या कामात बराच व्यत्यय येऊ लागला व शेवटी Wa साहेबांना कोर्टाचे दरवाजे बंद करावे लागले. तरीपण लोकसमुदाय कोर्टासमोरील भव्य पटांगणात सारखा बाबासाहेबांच्या आगमनाची वाट पाहात होता. कोर्टाचे काम बरोबर ५-२० ला संपताच ते बाहेर आले व थोड्याच वेळाने हस्तपत्रिकेत जाहीर केल्याप्रमाणे जळगाव येथील म्युनिसीपल टाऊन हॉलमध्ये डॉ. बाबासाहेबांची मोटार आली. त्यावेळी चार हजारावर लोकसमुदाय जमला होता. रणगर्जनेने व जयजयकाराने बाबासाहेबांचे स्वागत करण्यात आले व सभेच्या कामास सुरूवात झाली. सदर प्रसंगी नाशिक येथील प्रमुख पुढारी श्री. भाऊराव गायकवाड, अहमदनगरचे तरुण पुढारी श्री. प्रभाकर जनार्दन रोहम व बलराम दादा टेलर इत्यादि मंडळी हजर होती. पहिल्या प्रथम श्री. भाऊराव गायकवाड यांचे येत्या असेंब्लीच्या निवडणुकीविषयी जोरदार व अत्यंत कळकळीचे भाषण झाले.

जनता : १७ ऑक्टोबर, १९३६.