५५६ डाँ. वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
नंतर डॉ. बाबासाहेब बोलावयास उठले. त्यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट उठला, सर्वत्र त्यांच्या जयजयकाराचा ध्वनी उठू लागला. मग डॉ. बाबासाहेबांनी सर्वांस शांत होण्याचा इषारा करताच क्षणात सर्व वातावरण शांत झाले. अशातऱ्हेने आमच्या सेनानायकाचा प्रत्यक्ष हुकूम अंमलात आणण्याची साक्ष त्यांनी पटवून दिली. शांतता होताच डॉ. बाबासाहेब म्हणाले,
आजची ही सभा श्री. दौलतराव गुलाजी जाधव यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्यासाठी भरविण्यात आली आहे. तुमच्या पूर्व खानदेश जिल्ह्यातील पूर्व भागाचे राखीव जागेकरिता ते उभे आहेत. या जागेकरिता आणखीही उमेदवार उभे आहेत, असे मी ऐकतो. त्यापैकी मी मेढे, AER यांची नावे ऐकतो. या दोघांना मी चांगले ओळखतो. त्यांचा माझा संबंध आज १५-२० वर्षापासून आहे. त्यातल्यात्यात श्री. मेढेंशी माझा जास्त संबंध आहे. श्री. मेढेंनी येथे काही काम केले आहे, हे मी जाणून आहे. असे असता मी श्री. जाधवांनाच का उभे केले, असे पुष्कळांना वाटत असेल, पण त्याला कारण एकच आहे ते म्हणजे कायदे मंडळात हुशार, चाणाक्ष व समाजदक्ष लोकांची जरूरी आहे. आपणाला त्या कामास योग्य असाच इसम हवा आहे. भलत्या कामावर भलत्याच इसमाची निवड केली तर त्यास ते काम झेपणार नाही व त्याला ते काम येणार नाही. तुम्हाला जर एखादे घर बांधावयाचे असेल तर तुम्ही योग्य माणसांनाच जी ती कामे सांगता. सुताराला लोहाराचे काम सांगितले तर त्याला ती कामे करता येणार नाहीत. तुम्ही गवंड्याला गवंड्याचेच काम सांगणार आणि असे जर तुम्ही केले नाही तर घराऐवजी बेडौल डोलारा मात्र तुम्हाला दिसेल. पण योग्य ते काम योग्य त्या इसमाला दिले तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटणारी सुंदर इमारत तुम्ही पाहू शकाल. हीच गोष्ट व्यवहाराची आहे व ती तुम्ही प्रत्येकाने थोडा विचार केला तर कळून येणार आहे. मे. मेढे-बिन्हाडे हे म्युनिसीपालिटी, लोकल बोर्ड व स्कूल बोर्ड यांच्या कामालाच योग्य आहेत, पण त्यांनी जे काम आपणास पाहता येणे अशक्य आहे, अशा कामाची इच्छा करू नये. जर त्यांना खरेच समाजाचे हित व्हावे अशी कळकळ असेल तर त्यांनी थोडा वेळ मनाशी विचार करावा व अंत:करणापासून त्या कामाला कोण लायक आहे, हे ठरवावे व जर त्यांनी प्रामाणिकपणे विचार केला तर श्री. जाधवच त्या कामास योग्य आहेत, असेच त्यांचे मन त्यांना उत्तर देईल. ते काम त्यांच्याने होणार नाही. ते नालायक आहेत, असे मी म्हणत नाही, तर ज्या त्या कामाला जो तो इसम लायक असतो आणि या कामास श्री. जाधव जास्त लायक आहेत. कोन्सिलचे सर्व काम इंग्रजीतून चालते आणि म्हणूनच उमेदवाराला उत्तम तऱ्हेचे इंग्रजीचे ज्ञान पाहिजे. त्याला वाटेल ते प्रश्न विचारण्याची ताकद पाहिजे. या सर्व गोष्टी उत्तम इंग्रजी जाणणाऱ्यालाच शक्य आहेत.