समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे १९
ब्राह्मण, मराठा, महार, चांभार, मांग इत्यादी न म्हणता फक्त हिंदू असे म्हणावे तेणेकरून समाजात समता उत्पन्न होऊन एकी होईल. हिंदू म्हटल्याने कोणास कोणाचा तिरस्कार वाटणार नाही. कोणी कोणास हीन लेखणार नाही व कोणी कोणास श्रेष्ठ मानणार नाही. शिवाय व्यक्ती-व्यक्तीची परस्परातील सहानुभूती जातिवाचक न राहून आज समाजात अन्याय, बेकी, बेदिली नष्ट होऊन बिमोड होईल. आज मराठा असला तरच इतर मराठा त्याला आपली सहानुभूती दर्शवितो. तसेच ब्राह्मण ब्राह्मणाशिवाय सहानुभूती दाखविण्यास तयार होत नाहीत. परंतु जेथे सर्वच हिंदू तेथे सहानुभूतीच्या आड काहीच नाही. मुसलमान समाजात आज जी एकी आहे तिचे तरी कारण काय, हेच. त्यांच्यात मुसलमान म्हटला की झाले. तो आपला झाला. तसे हिंदुमध्ये व्हावयास त्यांना सर्वसाधारण असे नाव पाहिजे व ते हिंदू असावे असे माझे मत आहे.
ही स्थित्यंतरे घडून येतील तो सुदीन; पण ही घडवून आणण्यास काय करावे, हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे.
काही बाबतीत राजदंड लाविल्याखेरीज सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणे दुरापास्त आहे. म्हणून सामाजिक व धार्मिक बाबतीत जेथे तेथे कायदा करून सुधारणा करावी की न करावी यासंबंधी बरीच भवती न भवती होऊन, शेवटी इंग्रज सरकारने असा ठराव केला आहे की जाती व रूढी यावर कायद्याचा पगडा बसविण्यास आपण कबूल नाही. या दृष्टीने पाहता हिंदुस्थानात स्वराज्य मिळविण्याचा योग आला आहे, ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे; असे मी समजतो. कारण ब्रिटिशांचा राजदंड आम्हास “ असून अडथळा व नसून खोळंबा “ असा आहे. आमच्या लोकास स्वराज्याचे मोठे भय वाटते व आम्हास स्वराज्य ज्याचे रूपांतर पेशवाईतच होईल असे भासते पण तसे म्हणणे कोणत्या विचाराचे दर्शक आहे ? कारण पेशवाई स्वराज्य व हल्लीचे स्वराज्य यात बराच फरक आहे. पेशवाईमध्ये एकदा स्थापलेले राजे वंशपरंपरा राज्य करीत असत. प्रजेच्या संमतीने राज्य करीत नसत. भावी स्वराज्यात राज्यसरकार प्रजेच्या संमतीने चालणारे असून त्यात कायमचे राजे असे कोणीच असू शकणार नाहीत.” अशा प्रकारच्या स्वराज्यात जर प्रजेच्या हिताची हेळसांड झाली तर तिचे संवर्धन दुसऱ्या प्रकारच्या कोणत्याच राजकारणात होणार नाही असा सर्व जगाचा अनुभव असल्यामुळे प्रजासंमत स्वराज्य ही सर्वोत्तम अशी राज्यव्यवस्था आहे हे निर्विवाद आहे. अशा प्रकारच्या स्वराज्याला आपण बुजून का जावे याचा मला मोठा विस्मय वाटतो. उलट त्याच्या प्राप्तीप्रित्यर्थ आपण प्रयत्न करणे फार जरूर आहे. मला स्वराज्य म्हणजे काय अभिप्रेत आहे याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.