११- ४-१९२५ घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल - Page 69

घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल २७

निराळ्या रीतीने लावणे भाग आहे. इंग्लंडमध्ये बर्कले नावाचा एक फार भोठा तत्त्ववेत्ता होऊन गेला. तो नाना तऱ्हेची तात्त्विक कोडी रचून लोकांना अडवीत असे व लोक त्याच्या कोड्यापुढे अगदी कुंठित होत असत. अशापरी गांजलेल्या एका गृहस्थाने डॉ. जान्सन यांची मदत घ्यावी म्हणून त्याकडे गेला व बर्कलेचे एक कोडे सांगून ते उकलण्यास आर्जव करू लागला. काही वेळानंतर जवळच धोंडा पडला होता त्यावर तो कागद ठेवून ठोकर मारून डॉ. जान्सन म्हणाला, हे पहा अशा रीतीने मी त्याचे कोडे सहज उकलतो. हाच न्याय या हलकट शास्त्रांना लागू करणे रास्त आहे. खरोखरी ही शास्त्रे सर्व जनतेचा अपमान करणारी आहेत. ही सरकारने केव्हाच जप्त करायला पाहिजे होती. निदान त्यांचा जप करणारांनी सामाजिक प्रश्‍नांची तडजोड होत असता ती मधे आणू नयेत, नाहीतर भयंकर प्रसंग ओढवण्याची भीती आहे. सर्वांनी बरोबरीचे नाते राखून, एकमेकास प्रसंगोपात्त मदत करून, जेणेकरून समाजात सौख्य नांदेल अशा रीतीने आपले वर्तन ठेवणे हाच समाज रचनेचा आद्य हेतू आहे. ज्यावेळी समाजातील काही लोक प्रबल होऊन इतरांवर जुलूम करू लागल्यामुळे समाजसंघटनेचा हा हेतू सिद्धीस जात नाही असे दृष्टोत्पत्तीस येईल, त्यावेळी तेथेच चाचपडत न बसता, आपले सर्व इतर उद्योग बाजूस सारून मोठ्या नेटाने श्रम करून प्रबळ झालेल्या त्या मदांधांची शेंडी धरून त्यास खाली वाकविणे हेच समाजातील प्रत्येक व्यक्तिमात्राचे कर्तव्यकर्म होय. सर्व लोकांची स्थिती सर्वतोपरी तंतोतंत सारखी ठेवण्याविषयी सर्वानी झटावे ही आमची मागणी नाही. ज्याप्रमाणे लहान नवरा व मोठी बायको यांचा जोडा जमला असता मुलीस यौवनावस्था प्राप्त होऊन मुलाची फजिती न व्हावी म्हणून मुलीचे मीठ तोडा असे सुचवितात त्याप्रमाणे आम्ही दरिद्री आहोत म्हणून इतरांचे + द्रव्य लुबाडून त्यांना आमच्या बरोबर दरिद्री करा असे आम्ही सुचवित नाही. आम्ही आपले मानव जातीस प्राप्त असलेले समान हक्क मागत आहोत. परंतु ते मिळण्यासदेखील आम्हाला शास्त्रांची आडकाठी आहे. जेथे जेथे म्हणून हे हक्क हिरावून घेण्यात आले होते तेथे तेथे मोठी रणे माजली होती. फ्रांसमधील वरिष्ठ लोकांनी छळ केल्यामुळे कनिष्ठ लोकांनी त्यांची कत्तल उडविली; अमेरिकेतील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सहा वर्ष अमेरिकन लोकांनी आपसात यादवी केली. या यादवीत अनेक लोक मेले ही गोष्ट खरी, पण जे मेले ते व्यर्थ गेले नाहीत; तर त्यांनी जे उरले त्यांचे जीवन सुखावह केले. असा एखादा घनघोर संग्राम केला तरच आपली हरण करण्यात आलेली माणुसकी आपणास परत मिळेल किंवा एखाद्या सौम्य उपायाने लाभेल. हा प्रश्‍न तूर्त बाजूला ठेवला तरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे व ती ही की इतका