घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल २९
असल्यामुळे व त्यास स्वतंत्रपणे कमाई करण्याची धमक नसल्यामुळे आधीच तो कर्जाखाली चेंगरून जातो व त्याचा प्रपंच त्याला भागत नाही. इतक्यात त्याला मुले झाली म्हणजे तो आणखी एक भार त्याच्यावर पडतो. त्यांना शिक्षण देऊन आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आणण्यास जवळ ऐपत नसते. इकडे त्याचा प्रपंच वाढत चालल्याने आपल्या उत्पन्नात भर पडावी म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या अज्ञानी व अडाणी स्थितीत कोठेतरी तो उद्योगास लावतो व त्याच्या कमाईवर आपला संसार चालवितो. लग्नाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे बाप बुडत असतो. पण तो काही शहाणपणा शिकत नाही. उलट तो आपल्या मुलांस त्याच गर्तेत लोटून देऊन साफ बुडवितो |
ज्याप्रमाणे आपल्यातले आईबाप मुलांचे नुकसान करतात त्याचप्रमाणे ते मुलीचेही मातेरे करतात. मुलांचे लहानपणी लग्न केल्यामुळे जे समाजाचे नुकसान होते त्यापेक्षाही जास्त मुलीना मुरळी सोडल्याने होते. हिंदू देवांना लहान मुली वाहण्याचा जो चमत्कारिक प्रघात या देशात पुरातन काळापासून चालत आहे, त्याचा फैलाव काही भागातील आमच्या लोकात विशेष जोराचा आहे. पूर्वी कदाचित ही चाल सदभावना प्रेरित असेल. पण हल्लीच्या काळी देवाची दासी म्हणजे विश्वाची योषिता, हेच खरे आहे. हिने आपला देह विकून आपल्या नातेवाईकांची पोटे भरावी । हा मुरळी सोडण्याचा प्रकार जेथे चालू आहे तेथे त्याच्या पाळया-मुळ्या इतक्या खोल गेल्या आहेत की या चालीला बळी पडलेले लोक कायद्याला सुद्धा जुमानीत नाहीत. हे लोक केवळ आपल्या मुलींचेच हितशत्रू नाहीत तर ते समाजाचेही शत्रू आहेत. कारण यांच्या करणीचा प्रत्यक्ष आघात समाजाची आद्यव्यवस्था म्हणजे कौटुंबिक व्यवस्था हिच्यावर होतो. एक पत्नी व एक पती हीच कोटुंबिक पद्धत रास्त आहे. कुटुंब म्हणजे आपल्या प्रजेचे संरक्षण व संगोपन करण्यास समाजाने स्थापन केलेली एक संस्था आहे. ही संस्था चालविणारी दांपत्ये जितकी जास्त शुद्ध, सात्विक व अभिमानी असतील तितकीच त्यापासून निपजणारी संतती शुद्ध, सात्त्विक व अभिमानी असू शकेल. एका बाईने पुष्कळ नवरे करावेत किंवा एका पुरुषाने पुष्कळ बायका कराव्यात, ही कोटुंबिक पद्धत फार अप्रशस्त आहे.
आपण जे आज मानसिक दोर्बल्यामुळे इतरांचे गुलाम बनलो आहोत, याचे कारण हेच की ज्यांचे हाती आपले भवितव्य ईश्वराने दिले आहे त्यांना त्यांच्या आहद्यकर्तव्याची ओळख नाही. ती ओळख जर त्यांना असती तर आपली स्थिती हीन दीन झाली नसती. आपणाला लोक गुलामाप्रमाणे वागवितात, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. पण आपले कर्तव्यशून्य आईबाप मागचा पुढचा विचार न करता बेसुमार मुले जन्मास आणून हा गुलामांचा बाजार मांडून ठेवतात. ही किती अनर्थाची गोष्ट आहे |