३० डाँ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सज्जनहो । आपण म्हणतो आपली स्थिती फार वाईट आहे, लोक आपणाला फार अन्यायाने वागवितात. या सर्व गोष्टी खऱ्या: पण या अन्यायाचा परिहार व्हावा कसा ? तुम्हाला कबूल करावे लागेल की एकदा लादलेल्या वर्चस्वाचा पेच सुटण्यास योग्य उपाय म्हटला म्हणजे ज्यांना त्या पेचाने रग लागली असेल त्यांनी शहाणपण शिकावे आणि सामर्थ्य संपादावे व दिवसाउजेडी प्रतिपक्षाशी सामना करून, त्यांच्या वरचढ होऊन त्यांच्या हातून निसदून जावे अशा प्रकारचे शहाणपण व सामर्थ्य आम्हास कसे व केव्हा प्राप्त होणार ? ज्या कारणामुळे आपल्यात शंहाणपण व सामर्थ्य नाही ती सर्वच काही वरिष्ठांच्या दडपणामुळे उत्पन्न झालेली नाहीत आणि यदाकदाचित तसेही असले तरी त्यातील काहीचा परिहार आपल्या हाती नाही असे नाही. आपल्या लोकांना जितक्या हलक्या प्रतीचे अन्न खावे लागते तितके दुसऱ्या कोणास खावे लागत नसेल ! पण याबद्दल आपल्या लोकांनी केव्हातरी तक्रार केली आहे काय ? उलट गावातून तुकडे मागून आणण्यात आपल्यातील किती एक लोक केवढा मोठा अभिमान बाळगतात. इतर लोक चांगला पोषाख घालून फिरतात. आपल्या लोकास एक पंचा, एक घोंगडे आणि जाडे भरडे पाच पन्नास हात मुंडासे यापेक्षा जास्त काही प्राप्त होत नाही: पण या दारिठ्र्याबद्दल आपल्या लोकांनी केव्हा तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे ? उलट मेलेल्या मुडद्यावरचे कफनाचे कपडे आणण्यास आमची नेहमीच तयारी असते. सरकार दरबार, कोर्ट कचेच्यात आम्हास आत घेत नाहीत; पण आमच्या लोकांनी आपले हक्क गेल्याबद्दल कधी
जळफळ केली आहे? उलट वरच्यापैकी कोणी एखाद्याने आमच्यातील
माणुसकीला मान देऊन वर बसा म्हणून सांगितले, तरी ' सरकार मला जोड्यात वागवा ' असा आम्ही आग्रह धरतोच ! या मानसिक दौर्बल्यास आमचे आम्हीच कारणीभूत नाहीत काय ? आपल्यातील आईबापांनी आपल्या खऱ्या कर्तव्याला जागून, कर्ज काढून मुलांची लग्ने करून अगर मुलींना मुरळ्या करून त्यांच्या कमाईवर संसार चालविणे इत्यादी अक्षम्य गोष्टी सोडून देऊन जर त्यांना ज्ञानसंपन्न केले तर आपली अशी स्थिती राहील काय ? ह्या गोष्टी करणे आपल्या हाती नाही काय? त्या जर आपण अंमलात आणू लागलो तर आपणाला कोणी आडवा येईल काय ?
सज्जनहो ! सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्याच्या मुलांनी करावे, हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदलल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण केव्हाही समर्थ होणार नाही. नुसत्ती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगती बरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे अवश्य आहे.