५-१९२६ मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आह - Page 75

मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे ३३

संपत्ती जसजशी अधिक येत जाईल तसतशी त्यांची प्रगती होत जाईल जे. पी. होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होत व ती आम्ही हाती घेतलीच पाहिजेत. ती तुम्ही घेऊ नका असे सोमणांसारखे जे लोक म्हणतात ते आमच्या लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आहे त्याच गुलामी परिस्थितीत ठेवण्याचा डाव खेळत आहेत. सोमणांच्या जातभाईनी गेल्या पाच हजार वर्षात ब्राह्मणेतरांचा व अस्पृश्यांचा अनेक युक्त्या योजून छळ केला. तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत, ब्राह्मणांपेक्षा लुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईनी पुराणादी धर्मशास्त्रात लिहून त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्यांकडून करविली. आता ते म्हणतात, “ देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचाच सदगुण आहे. म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास, देहदंड व सुळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत.” ब्राह्मणेतर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील : ' तुम्हाला राजकारण समजत नाही.' सरकारी नोकऱ्यातील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राह्मणांच्या हातात आहेत. ती ठिकाणे ब्राह्मणेतर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करू लागले की हे ब्राह्मण म्हणतील की या जागा भूषविण्यास तुम्ही लायक (एफिशिएंट) नाही. सांगण्याचा हेतू असा की धर्म, राजकारण, इत्यादी गोष्टीतही आम्हीच काय ते श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून आतापर्यंत ब्राह्मण वागत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपणा आणि बौद्धिक व्यभिचारीपणा आलेला आहे. ब्राह्मणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आतापर्यत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौद्धिक व्यभिचाराला भिऊन त्यांचे गुलाम म्हणून गुपचुपपणे वागत आलेले आहेत. परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र 'होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील. परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे. कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचारांच्या कितीही वल्गना मारीत असले तरी ते अद्याप मनाने व बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत. आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे. या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणांच्या गुलाभगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौद्धिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती सोमणांसारख्या भोंदू व भेदक लोकांनी तयार

केलेल्या खड्यात पडणार नाही.

७ ७७