७
जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ [नका ]
कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची बैठक मुक्काम महाड येथील सि. प्रा. ना. मंडळाच्या नाटकगृहात मार्च १९२७ ला शनिवार ता. १९ व रविवार ता. २० रोजी भरली होती. परिषदेत एकंदरीत ३,००० वर अस्पृश्य लोकांचा जमाव जमला होता. परिषदेस पुष्कळ प्रतिष्ठित मंडळी होती. त्यात मेसर्स गं. नि. सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सिताराम नामदेव शिवतरकर, बाळाराम आंबेडकर, पांडुरंग नथुराग राजभोज, शांताराम अनाजी उपशाम, मोरे, रामचंद्र शिंदे, धोंडीराम नारायण गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव वगैरे बहिष्कृत वर्गापैकी मंडळी हजर होती. परिषदेच्या कामास ता. १९ रोजी संध्याकाळी ५ वाजून गेल्यावर सुरवात झाली. आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या मंडळीचे स्वागत करून परिषद भरविण्याचा हेतू थोडक्यात सांगितला. नंतर नियमाप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम.ए., पीएच.डी., डी.एससी.,बारअँट-लॉ. हे स्थानापन्न झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
सद्गृहस्थ हो!
आज आपण जो माझा गौरव केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी
आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान मी स्वीकारावे अशी जेव्हा मागणी मजकडे करण्यात आली त्यावेळी माझ्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून मी ती टाळण्याच्या विचारात होतो. परंतु ती मला टाळता येणार नाही व टाळल्यास जनक्षोभ होईल असे जाणून मी ना-नु न करिता स्वसंतोषाने ती जबाबदारी स्वीकारली व तद्नुसार मी आज आपणापुढे उभा आहे.
सद्गृहस्थ हो! आज येथे येण्यास मला एकपरी अती आनंद होतो. ज्याला त्याला आपापल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले. माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाचा पायथा सोडल्या नंतर घाटमाथ्यावर माझे आजपर्यंतचे जीवित गेले. आज २५ वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो'प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने श्रृंगारला