१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 77

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ३५

आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे. ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळयाचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही. परंतु आजच्या प्रसंगी मला जितका आनंद होतो तितकाच खेदही होतो असे. म्हटल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळीने हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे पांढरपेशे लोक खेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता.

ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करीपेशा हे एक महत्त्वाचे कारण होते. ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकास नशीब काढण्यास किती वाव होता, याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही. परंतु त्याकाळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यावर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे, थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे. त्याकाळी वाव असला तरी अगदीच थोडा असला पाहिजे. इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कोठे या प्रांतातील अस्पृश्य लोकाना डोके वर काढण्यास संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे, किती तेज आहे व त्यांची बुद्धीमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले. याचा पुरावा जर पाहिजे असेल तर जुनी आर्मिलिस्टाची बाडे चाळून पाहिली म्हणजे बस्स होईल. या प्रांतातील अस्पृश्य वर्गात किती सुभेदार झाले, किती जमादार झाले, किती हवालदार झाले, नार्मल स्कूल सारख्या शाळातून पास होऊन किती हेडमास्तरांच्या हुद्यावर चढले, एजुटंट क्लार्क व क्वार्टर मास्तर क्लार्क सारख्या जबाबदारीच्या जागा कितीकांनी चालवून दाखविल्या याचा तपशील जर देऊ गेलो तर हे भाषण मयदिचे बाहेर वाढेल. इतके सांगितले म्हणजे पुरे आहे की, एकेकाळी जो अस्पृश्य वर्ग सेवक म्हणून नांदत होता तोच वर्ग पलटणीतील नोकरीमुळे अंधिकार संपन्न होऊन दुसऱ्या वर्गावर सत्ता गाजविता झाला होता. या पलटणीतील नोकरीमुळे हिंदुसमाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या महार, चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजत तेच मराठा शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व “ क्यु, बे “ म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे. एवढा अधिकार