१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 78

३६ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्य जातीतील लोकास या देशातील कोणत्याही प्रांतात यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल. या प्रांतातील अस्पृश्य लोकांनी आपला दर्जा वाढविला होता इतकेच नव्हे तर त्यांची शिक्षणातही विलक्षण प्रगती झाली होती. त्यांच्यातील ९० टक्के लोक साक्षर होते, इतकेच नव्हे तर ५० टक्के लोक तरी वरच्या दर्जाचे सुशिक्षित होते. त्यातल्यात्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियांतही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषाच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत. या शिक्षणातील प्रगतीला त्यांचा लष्करीपेशा बऱ्याच अंशी कारणीभूत झाला.

इंग्रजी राज्यास सुरवात होऊन १५० वर्षे होऊन गेली असता देखील प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात येत नाही, याबद्दल खेद वाटून ते आता तरी सुरु करा असे जे लोक म्हणतात त्यांना एक गोष्ट ठाऊक नाही असे दिसते. ईस्ट इंडिया कंपनीला शिक्षणप्रेमी लोक नेहमी दोष देतात की, कंपनीने राज्य चालविताना आपल्या फायद्याकडे काय ते लक्ष दिले, लोकांच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष दिले नाही. ही गोष्ट सर्वस्वी खरी नाही. निदान कंपनीच्या मिलटरी खात्यापुरती तरी ही गोष्ट साफ खोटी आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून मिलिटरीत पिढ्यान पिढ्या नोकरी केली आहे ते ग्वाही देऊ शकतील की कंपनीच्या अमदानीत प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे होते. प्राथमिक शिक्षण मुलांस व त्याचप्रमाणे मुलींसही सारख्याच रितीने लागू केले जात असे. मुलास प्राथमिक शिक्षणाशिवाय खालच्या दर्जाचे दुय्यम शिक्षणही सक्तीने लागू केले जात असे. सक्तीचा प्रकार काही साधा व सोपा नव्हता. मूल शाळेत न गेले तर पालकास दंड देऊन सुटता येत नसे. विशेष ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ही सक्ती बालक वर्गापुरती नसे. नवीन भरती झालेले वयातील रिक्रूट यांनाही रात्रीच्या शाळेत जाण्यास सक्ती करण्यात येत असे. कंपनीचे राज्य संपुष्टात आल्यानंतर बादशाही अंमल सुरू झाला व सत्तावन सालचे बंड मोडल्यानंतर जेव्हा इंग्रज सरकारने हिंदुस्थानातील सैन्यासंबंधी चौकशी करण्याकरिता एक कमिशन नेमिले होते, त्यात काही साक्षीदारांनी सैन्यात शिक्षणाचा प्रसार झाला तर अनर्थ ओढवेल असे प्रलाप काढले. त्यास भिऊन मिलटरी खात्यात जारी असलेल्या शिक्षणाकडे प्रथमतः दुर्लक्ष करण्यात आले व शेवटी शेवटी त्याचा अगदी बिमोड करण्यात आला. ते कसेही असो, जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गाचा अतोनात फायदा झाला होता. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा उत्तम तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल स्वाभिमान वाटल्यावाचून राहणार नाही. या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह