जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ३७
झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. श्रीधर स्वामीच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील. परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर, इत्यादि महाराष्ट्रातील जुनाट व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखीत प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही . पाहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी काही दुर्मिळ अशा ग्रंथाच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या आता दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे. काही वर्षापूर्वी श्री. पांगारकर यांनी राघवचित्तघन या कवीने लिहिलेला ''ज्ञानसुधा'' नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरीत जाहिरात दिली होती. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहावयास सापडेल. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकास ज्या काळी विद्येची सर्व दारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथसंग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल, याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा. ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावह आहे, याबद्दल दुमत होणे शक्य नाही. दुसऱ्या तऱ्हेने पाहता, त्या काळच्या लोकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्यप्रकारे केला असे दिसून येईल. सार्वजनिक व्यवसायात पडणाऱ्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की काही "नामके वास्ते” तर काही ““कामके वास्ते'' म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात. आणि जे पडतात त्यात ' नामके वास्ते ' अशांचाच भरणा जास्त असतो. हल्ली अस्पृश्यांची जी चालक मंडळी आहे त्यातही नामके वास्ते लोकांचा काही कमी भरणा .नाही. पुण्यातले लोक म्हणतात की, अस्पृश्यातील जागृतीचे मूळ उत्पादक आम्ही आहोत. मुंबईतही हा मान सर्वस्वी आमचा आहे असे म्हणणारे काही लोकप्रिय लोक आहेत. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी, भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या काही चालकांचे असे म्हणणे आहे की, अस्पृश्यातील जागृती ही आमच्यापासून सुरु झाली आहे. जे लोक अशा तऱहेने ओढून मान मागतात त्यांना अस्पृश्योन्नतीच्या चळवळीचा खरा इतिहास अवगत नाही असेच म्हटले पाहिजे. मुंबई इलाख्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरिता ज्या संस्था कालांतराने स्थापन झाल्या त्यात ' अनार्य दोष परिहारक मंडळी ' ही पहिली संस्था आहे असे संशोधनाअंती दिसून येईल. १८९३ साली जेव्हा अस्पृश्य लोकांना लष्करात भरती होण्याची बंदी झाली त्यावेळी याच संस्थेने प. वा. महादेव गोविंद रानडे यांच्या सहाय्याने सरकारकडे एक मोठा अर्ज केला होता. यावरून या संस्थेची सल्लामसलत मोठमोठ्या लोकांशी होत असे हे उघड आहे. १८९७ साली कॉँग्रेसला उद्देशून