४० डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेचे मुख्य कारण आहे. आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करतो. उजव्या गालावर कोणी थप्पड मारल्यास आम्ही आपला डावा गाल पुढे करतो, पण मारणाऱ्याचा प्रतिकार करण्यास आमचा हात वर जात नाही. आकाश जरी कोसळले तरी आम्ही एखाद्या हवालदिलाप्रमाणे नशीब म्हणून स्वस्थ बसतो. ह्या आत्मघातकी वृत्तीचा आम्ही जितक्या लवकर त्याग करू तितके आपल्या फायद्याचे आहे. म्हणून मी आपणास असे सांगतो की, लष्कर भरतीची बंदी दूर करण्याचा आम्ही शक्य तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे.
परंतु मी आपणापुढे जो प्रश्न मांडणार आहे तो असा की लष्कर भरती झाली तर सर्व कार्यभाग आटोपला काय? आपणातील बऱ्याच लोकांचा असा समज आहे की लष्कराची भरती एकदा मोकळी झाली म्हणजे सर्व काही झाले, बाकी काही करावयास नको. मला असे वाटते की ही चूक आहे. एकतर असे की सर्वच लोकांचा पलटणीत शिरकाव होणे शक्य नाही. जेव्हा पलटणीत राहण्यास कोणत्याच वर्गातले लोक तयार नव्हते तेव्हा आपल्या लोकांना मुबलक वाव होता, पण आता तशी स्थिती नाही. इतरांबरोबर आपणास जे मिळावयाचे तेवढेच मिळेल. जास्तीची आशा करणे निरर्थक आहे. यास्तव पलटणीशिवाय आपल्या उन्नतीसाठी कोणती इतर व्यवस्था करता येईल याबद्दल आपण विचार करावयास पाहिजे. अस्पृश्य समाजात घंदेवाईक जातीत समाविष्ट असलेले लोक फार थोडे आहेत. चांभार लोकच काय ते घंदेवाईक आहेत. पण त्यांनीही हा धंदा आता जवळजवळ सोडल्यासारखा आहे. म्हणून बिन- धंदेवाईकांचाच भरणा जास्त आहे. अमुक एक धंदा म्हणून अमुक एका जातीची खोती असा जेथे प्रघात आहे तेथे अमुक एक धंदा तुम्हास करता येण्यासारखा आहे तो करा असे सांगणे म्हणजे वायफळ उपदेश आहे. त्यांना जर धंद्यात पडावयाचे असेल तर तो धंदा अशा प्रकारचा असला पाहिजे की जो कोणत्याही जातीतल्या माणसास करण्यास मोकळीक आहे. अशा प्रकारचे धंदे मला तरी दोनच दिसतात. एक पांढरपेशा व दुसरा शेती.
पांढरपेशा अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी स्वीकारावा हा उपदेश कितीएक वरच्या वर्गातील लोकांना रुचत नाही हे मला माहीत आहे. त्यांना असे वाटते की अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सुतारी, लोहारी, विणकरी वगैरे व्यवसाय करावे. पण काही झाले तरी पांढरपेशा स्वीकारू नये. हा त्यांचा उपदेश आपल्या हिताचा नाही हे मी आपणास निक्षून सांगतो. अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे असे माझे मत आहे. एक त्यांच्या मनावर जो जुन्या, खुळचट व अनिष्ट विचारांचा जंग बसला आहे तो साफ घासून निघाला पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत