४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपापल्या मुलांना बी.ए., एम.ए. पर्यंतचे शिक्षण त्यांना देता आले असते. याचा परिणाम काय झाला असता याची कल्पना सहज करता येण्यासारखी आहे, ही शिकलेली मुले आज मामलेदार, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट वगैरे हुद्यावर जर चढली असती तर आज सर्व अस्पृश्य समाजावर त्यांचा वज्रपंजर असता. त्यांच्या छत्रछायेखाली आपली वाढ झाली असती परंतु तसे न झाल्याकारणाने आज आपण उन्हात तापत पडलो आहोत, अगदी करपून जात आहोत. माझी अशी दृढ भावना झाली आहे की, आपण अशा प्रकारची आपल्यावर सावली करून घेतल्याखेरीज आपली मुळीच वाढ होणार नाही. ही सावली पांढरपेशा पत्करून सरकारी नोकरीत आपला शिरकाव करून घेतल्याखेरीज होणार नाही. म्हणून आपणा सर्वांस मी अशी सूचना करत आहे की आपण आधी उच्चप्रतीच्या . शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे. एक मुलगा बी. ए. झाल्याने आपल्या अस्पृश्य समाजास तो जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी शिकून पास झाली तरी होणार नाही. प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हणत नाही. मी जे म्हणतो ते हे की हल्लीची आपली परिस्थिती अशी चमत्कारीक | आहे की वरच्या प्रतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला जितक्या लवकर शिखरास नेवून पोहचवू तितके बरे. याकरिता या प्रांतात आपल्या लोकांकरिता एखादे बोर्डीग असणे अत्यंत आवश्यक आहे. ठाणे आणि कुलाबा जिल्हा यातील विद्यार्थ्यास सोईस्कर व्हावे म्हणून मी पनवेल मुक्कामी बोर्डीग काढण्याचे योजिले आहे. त्यास तुम्ही सर्वजण द्रव्यद्वारा शक्यनुसार मदत कराल अशी आशा आहे.
दुसरा धंदा मी जो आपणास सुचविला आहे तो शेती आहे. हा धंदा सुचविण्यात माझा हेतू असा आहे की, आपल्या अस्पृश्य वर्गानी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्ररितीने जीवित घालविण्याची व्यवस्था करावी. आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणाऱया जातींपैकी महार जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालविण्याची या जातीला सवय पडून गेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही, मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान मष्ट झाला आहे. काहीही म्हणा ! जोड्यात वागवा ! पण मला तुकडा वाढा. अशी या जातीची वृत्ती बनून गेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. कारण आज जर देवळात शिरू म्हटले, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू म्हटले, मेलेले जनावर ओढणार नाही म्हटले तर उद्या गावातील लोकांच्या भाकऱ्या बंद झाल्या की यांच्या नाड्या मेल्याच. AM- रितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे. हा तुकडा मागावयाचा सोडून गावातील इतर लोकांप्रमाणे जर शेती केली तर होणार नाही काय ? शेती विकत घेणे हे अस्पृश्य लोकांना कदाचित कठीण जाईल. पण जंगल खात्याच्या कितीतरी :