१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 85

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ४३

पडीत जमीनी आहेत त्या जर एखाद्या अस्पृश्य वर्गाच्या माणसाने मागणी केली तर त्याला मिळण्यासारख्या आहेत.

पण या गोष्टी घडून कशा याव्यात ? मला असे वाटते की जोपर्यंत आम्हाला शिळे तुकडे खावयाला मिळत आहेत तोपर्यंत आहे ही स्थिती बहुतेक कायमच राहील. जुना मार्ग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नव्या मार्गाने जाण्यास कोणीच निघणार नाही. जुन्या मार्गाचा अवलंब करून आज माणुसकीला आपण दुरावलो आहोत. तो मार्ग किती दिवस तुम्ही चालू ठेवाल याचा तुम्ही विचार करा सद्गृहस्थ हो! ata सुधारणेच्या बाबतीत ''वडिलांची रीत” हा या प्रांतातील लोकांचा महामंत्र असतो व सर्व प्रकारच्या नव्या योजनेच्या वेळी मग ती बरी असो किंवा वाईट असो त्याचा जप चालावयाचाच. याचा अर्थ वडिलांनी ` काही बाबतीत असमंजसपणाने एखादा प्रघात सुरू केला तर त्याच्या वंशजांनी मग तो प्रघात त्यांना कितीही विघातक असो तो चालूच ठेवावयाचा. सर्वच ठिकाणी जुने ते सोने या म्हणीस जर आपण धरून बसलो तर नवीन सुधारणा कधीच होणार नाही. शिवाय दरेक आईबापाची अशी इच्छा नसावी काय की आमच्या मुलालेकरांची स्थिती आमची आहे तिच्यापेक्षा काकणभर अधिक असावी. अशी ज्यांची इच्छा नसेल त्या आईबापाच्या जोडप्यात व पशुच्या जोडप्यात काय अंतर आहे मला समजत नाही. सद्गृहस्थ हो! तुम्ही आपल्यासाठी जरी नाही तरी आपल्या संततीसाठी मी जे सांगतो याकडे लक्ष द्या. आज आपणास भाकरी मिळते तेवढी बस्स आहे. ह्या मोठ्या भानगडी आम्हास नकोत, अर्धी सोडून सगळीच्या मागे कोणी जावे असा आपण पोक्तपणाने प्रश्‍न कराल. पण मी आपणास इशारा देतो की मी सांगतो त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केला नाही तर आज जी चतकोर भाकरी मिळत आहे ती उद्या मिळणार देखील नाही.

हे विचार मी फक्त आपल्या पुढे मांडले असे नाही, जेथे जेथे मला बोलण्याचा प्रसंग आला तेथे तेथे मी हेच विचार मांडले आहेत. आपल्याला विशेषत: सांगावयाची गोष्ट ही की, आपण सर्वानी जागृतीचे काम विशेष जोराने करावयास पाहिजे. पलटणीतल्या पिढीचा नष्टांश झाल्यापासून या प्रांतातील लोकांना-मृत कळा आल्यासारखी झाली आहे. कसल्याच प्रकारची हालचाल नाही. घाटावर अनेक परिषदा होऊन गेल्या, तेव्हा आता कोठे ही सभा होत आहे. जागृतीचा . विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये. या जागृतीच्या कामासाठी तुम्हाला काही स्थानिक पुढाऱ्यांची जरूरी आहे. मार्गदर्शकाशिवाय मार्ग चालणे अशक्य वाटते. आपल्यातील जे काही पेन्शनर लोक आहेत त्यांनी या गोष्टीत लक्ष घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते या स्वजनोद्धाराच्या महत्त्कार्यात पुढाकार घेतील अशी आशा ठेवून मी आपले भाषण पुरे करतो.