१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 86

४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुसऱ्या दिवशी परिषदेच्या कामास पुन्हा सकाळी ९ वाजून गेल्यावर

सुरवात झाली व खालील ठराव पास झाले

गट१ला

ठराव १ ला.-बहिष्कृत वर्गानी चालविलेल्या आत्मोद्धाराच्या चळवळींमुळे वरिष्ठ वर्ग व बहिष्कृत वर्ग यांच्यामध्ये परस्परात तेढ उत्पन्न होऊ नये अशी वरिष्ठ वर्गातील हिदुंची इच्छा असल्यास ही परिषद त्यांना पुढील सूचना करीत आहे.- ॒

(अ) बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे व पाणवठे यांचा उपयोग करुन आपले नागरिकत्वाचे हकक बजावण्याचा प्रयत्न करीत असताना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करुन त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करिता अशावेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय सहाय्य करावे.

(ब) वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतास घरगुती नोकर म्हणून नोकरीस

ठेवावे.

(क) जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्रविवाह पद्धतीचा प्रघात सुरु करावा.

(ड) बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे आपले घरी वार लावून किंवा त्यांच्या भोजनाची तरतूद करुन त्यांना मदत करावी.

(इ) मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी.

गट ररा

ठराव १ ला.-मागील कायदेकोन्सिलामध्ये श्री. सी. के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी व तलावासंबंधानेही ठराव आणला आहे. त्याची सरकारने अंमलबजावणी करुन त्या ठिकाणी पाट्या लावण्याची व्यवस्था करावी आणि जरूर तर क्रि. प्रो. कोड सेक्शन १४४ अंमलात आणून स्थानिक पुढाऱ्यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हकक उपभोगण्यास मदत करावी.

ठराव २ रा.-ही सभा सरकारास अशी विनंती करीत आहे की, खेडेगावी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय होते ती दूर करण्याची व्यवस्था करावी.

ठराव ३ रा.-बहिष्कृत लोकाच्या आर्थिक उन्नतीस्तव फॉरेस्ट जमीनी लागवडीस द्याव्या.