१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 89

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ४७

नंतर अध्यक्षाने समारोप केल्यावर रा. शिवराम गोपाळ जाधव यांनी आलेल्या मंडळींचे व अध्यक्षांचे आभार मानले. त्यास दुजोरा देण्यास रा. अनंत विनायक चित्रे हे उभे राहिले. त्यांनी आभाराच्या ठरावास अनुमोदन दिल्यानंतर परिषदेस उद्देशून असे सुचविले की, आज जी एवढी मोठी महत्त्वाची परिषद भरली आहे तिने काही तरी महत्त्वाचे कार्य केल्याखेरीज आपले अधिवेशन संपवू नये असे मला वाटते. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून येथील म्युनिसीपालिटीने येथील तळी सर्व जातीच्या लोकास खुली आहेत असे ठरावाने कधीच जाहीर करून टाकिले आहे. परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात अस्पृश्य लोकांकडून अजूनही सुरु करण्यात आला नाही. तो प्रघात जर आज या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक मोठी महत्त्वाची कामगिरी बजाविली असे म्हणता येईल. तरी

आपण सर्वानी अध्यक्षांसह महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करुन पाणी घेऊ.

` त्यानंतर परिषदेतील सर्व लोक अध्यक्षांच्या मागोमाग सभा मंडपातून बाहेर पडून त्या सर्वाची एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महाड शहरातील पेठेतून अत्यंत शांतपणाने तळ्यावर गेली

आंबेडकर आता चवदार तळ्याच्या काठावर उभे होते. जगातील पंडितांमधील एक विख्यात पंडितवर्य, उदात्त ध्येयाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी, दलितांचे स्वातंत्र्यसूर्य डॉ. आंबेडकर हे कृतिक्षेत्रात उतरले. स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात. ते स्वसामर्थ्याने संपादावयाचे असतात. देणगी म्हणून ते लाभत नसतात, हे त्रिकालाबाधित महानुभावाचे प्रत्यक्ष पाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना देत होते. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो तो ज्याचा त्याने करावयाचा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कृतिवीर बनून अनुयायांना श्रीगणेशाचा पाठ देत होते. त्यांना सुसंघटित नि प्रतिकारक्षम बनवीत होते. कृतिशूरपणा हा इतिहास घडविणाऱ्या थोर पुरूषांचा देहस्वभाव असतो.

ध्येयाविषयी अढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितात निष्ठा निर्माण करीत होते. ज्या ध्येयाचा ते उद्घोष करीत राहिले होते, ते ध्येय आता झगड्याच्या अग्निदिव्यातून तावून-सुलाखून निघत होते. डॉ. आंबेडकर आता स्वतः तळ्याच्या काठावर उभे राहिले. ज्या पानवठ्यावर पशु-पक्षी आपली तहान भागवीत, त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागविण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नि मायभूमीत मज्जाव होता, ज्याला सार्वजनिक स्थळे नि देवळे ह्यांची द्वारे बंद होती, असा तो महापुरुष हिंदुधर्म मार्तडांचा नि हिंदुधर्ममतांचा ढोंगीपणा भारताच्या वेशीवर टांगीत होता. सर्वाभूती परमेश्वर आहे असा धर्मप्रणित उद्घोष उच्चरवाने करणाऱ्या नि कुत्र्या-मांजरांना जवळ करीत असताही स्वधर्मियांना पशुहून नीच मानणाऱ्या त्या घोर पातक्यांचे अघोर पातक तो क्रांतिपुरुष जगाला उघड करुन दाखवीत होता.

१ बहिष्कृत भारत : ३ एप्रिल १९२७.