३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण जातिभेद हेच आहे - Page 102

६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुसरी गोष्ट तुम्हास सांगावयाची म्हणजे तुम्ही सध्या काँग्रेस या संस्थेपासून दूर राहिले पाहिजे आणि याचे कारण एकच आहे. ते म्हणजे काँग्रेस ही मायावी सृष्टी आहे. मला तुम्ही असे सांगा की गावातील मारवाडी किंवा सावकार याने ४ आण्याची काँग्रेसची वर्गणी भरली किंवा गांधी टोपी डोकीवर चढविली म्हणजे : देहस्वभाव कसा विसरू शकेल ? तो आपल्या गरीब कुळांकडून व्याज उकळल्याशिवाय कसा राहील ? तुमच्या माना मुरगळणे तो कसा सोडून देईल ? आणि आज काँग्रेस सांगत आहे की आम्ही सावकारांचे हित साधणार आहोत व गरिबांचेही हित साधणार आहो. मांजर व उंदीर या दोघांनाही ती एके ठिकाणी कशी वागवणार व मांजराच्या पुढ्यात उंदीर ठेवून उंदराचा जीव कसा बचावणार ? हे तुम्हीच पाहिले पाहिजे. आपल्याला मांजराशी काही कर्तव्य नाही. आपल्याला उंदराचा जीव वाचवायचा आहे. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे बचावाचे करावयाचे आहे. म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे आणि ती शक्ती वाढविणे म्हणजे तुमच्याच हिताकरिता अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होणे हे होय. तुम्हाला हया पक्षात सामील होण्याकरिता वर्षाचे काठी फक्त ४ आणे द्यावे लागतील. तरी तुम्ही सर्वानी स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद झाले पाहिजे. एवढेच तुम्हाला मला आज सांगावयाचे आहे. नंतर डॉक्टरसाहेबांस व इतर मंडळींना हारतुरे अर्पण करण्यात आले व चहापानानंतर दौऱ्यातील मंडळी पंढरपूरच्या मार्गास लागली.