३१-१२-१९३७ जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा - Page 104

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६६

लागे. असा क्रम काही काळ चालल्यावर एका नाक्यावर मिरवणूक आली. मिरवणुकीतून बाहेर पडल्याशिवाय पुढे जाणे शक्‍य नसल्यामुळे मोटार दुसऱ्या रस्त्यावर काढण्यात आली व लोकांना सभेस हजर राहावयास सांगून बाबासाहेब त्वरित डाक बंगल्यावर आपल्या उतरण्याच्या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणी देखील काही लोक अगोदरच येऊन बसले होते व बाबासाहेबांच्या आगमनानंतर आणखी लोक येऊ लागले. अनेक लोक गावकऱयांकडून होणारा त्रास डॉक्टरसाहेबांच्या कानावर घालीत होते व साहेबांचे दर्शन घेऊन व त्यांचे दोन शब्द ऐकून निरोप घेत होते. जेवणानंतर ३ वाजण्याचे सुमारास सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषदेस हजर राहाण्याकरिता आपल्याबरोबरील मंडळीसह डॉक्टरसाहेब निघाले. डॉक्टरसाहेबांस भेटण्याकरिता पंढरपूर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. ब. परिचारक आले होते. ते देखील परिषदेस हजर राहाण्यासाठी निघाले. परिषदेची जागा म्युनिसिपल धर्मशाळेत ठरविण्यात आली होती. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे आगमन होताच जमलेल्या प्रचंड लोक समुदायाने त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात व जयघोषात स्वागत केले व ताबडतोब

सभेच्या कामासं सुरूवात झाली.

प्रथमतः मुलींचे स्वागतपर सुस्वर गायन झाले.

स्वागताध्यक्ष मे. जीवाप्पा ऐदाळे, एम. एल. ए. यांचे भाषण झाल्यावर परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास डॉ. बाबासाहेबांस विनंती करण्यात आली व त्या सूचनेस रीतसर अनुमोदन देण्यात आल्यावर त्यांचे खालीलप्रमाणे भाषण झाले.

ते म्हणाले,

वास्तविक या परिषदेचे अध्यक्षीय भाषण लिहून काढून ते आपल्यासमोर वाचावयास पाहिजे होते. परंतु वेळेच्या अभावी तसे मला करता आले नाहीः याबद्दल दिलगीर आहे. तेव्हा उगाच पाल्हाळिक भाषण करण्याचे मला कारण नाही. आज मी प्रामुख्याने तीन प्रश्नासंबंधी बोलणार आहे. एक, आपल्याला हिंदू समाजात समतेचे स्थान मिळेल काय ? दोन, आपल्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला विचार करावयाचा म्हणजे आपल्याला संपत्तीचा योग्य वाटा मिळाला आहे काय ? तीन. आपण आत्मोन्रतीची चळवळ केली तर आमचेवर जुलूम होतो, याचा प्रतिकार करण्यास आपण कसे समर्थ व्हावयाचे ?

पहिल्या प्रश्‍नाचा विचार आपण पूर्ण केलेला आहे. या प्रश्‍नाशीच धर्मांतराचा प्रश्‍न निगडित आहे. त्यासंबंधी मी आज या ठिकाणी जास्त बोलू इच्छित नाही. मात्र तुम्हास या पंढरपूर गावी मुद्दाम चोखोबाची स्मृती करून द्यावयाची आहे. मंगळवेढ्यास कूस बांधावयाचे होते आणि त्याकरता पंढरपुराहून महारास वेठीस धरले होते. त्यामध्ये चोखोबाही होता. काम चालू असता एक भिंत कोसळून पडली आणि त्यामध्ये चोखोबादेखील भिंतीखाली सापडून मृत्यू