जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा ६७
पावला. नंतर चोखोबाची समाधी बांधावयाची होती त्याकरता चोखोबाची हाडे
लोकांना पाहिजे होती. बरेच महार त्याठिकाणी मरण पावले असल्यामुळे त्या
सर्वांचीच हाडे त्याठिकाणी पुरली गेली होती. त्यापैकी चोखोबाची हाडे कोणती
हे कळणे शक्य नव्हते. तेव्हा लोक नामदेवास भेटले व त्यांनी याबाबतीत मार्ग
काढण्यास नामदेवास विनंती केली. नामदेवाने सांगितले की चोखोबाची हाडे
अनेक हाडातून हुडकून काढणे अवघड नाही. कारण चोखोबाची हाडे विठ्ठल
नामाचा गजर करीत असणार, तरी ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल
ती हाडे चोखोबाची असे समजून ती उचलून आणावी व त्यावर समाधी
चढवावी. आता हाडातून ध्वनी निघण्याचा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी
चोखोबाच्या योग्यतेसंबंधी एवढे निर्विवाद की त्याच्या निर्जीव अस्थीतूनदेखील
विठ्ठल नामाचा उच्चार व्हावा ; इतकी त्याची महती होती. ज्ञानदेव, सोपानदेव,
मुक्ताबाई इत्यादी संतांच्या मालिकेत चोखोबाला स्थान प्राप्त झाले होते. पण
त्याला देखील विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करता आला नाही. त्याची समाधीदेखील
मंदिरापासून दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे व चोखोबाच्यावेळेस जी
परिस्थिती होती ; त्याच्याकाळी ज्या रीतीने त्याच्या जातीबांधवांना वागविल्या
जात होते त्याच रीतीने चोखोबाचा जन्म ज्या वर्गात झाला होता त्या वर्गास आज 'देखील त्याच हीन दर्जाने लेखले जात आहे. त्याच मापाने आज आपल्याला
मोजले जात आहे. म्हणून ज्या धर्माची चोखोबाने कास धरली त्याच धर्माची आम्ही कास का धरावी? त्या धर्मात आपल्याला नेहमी हीन लेखले
जाणार ! याकरिता त्या धर्मापासून आपल्याला दूरच राहिले पाहिजे.
दुसरा प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न-आपल्या पोटापाण्याचा प्रश्न. आज
देशातील सर्व संपत्ती पांढरपेशा वर्ग बळकावून बसला आहे. त्याचा ऐषआराम
चालू आहे. तर तुम्हाला पोटभर खायला नाही किवा अंग झाकायला वस्त्र
नाही. नुकतीच एक बाई मजजवळ तिच्या मुलाला आंगडे घेण्याकरिता दोन
आणे मागत होती. ती जी बाईची स्थिती तीच आपल्या सर्व वर्गाची आहे. याचे
कारण त्यांच्या वाट्यास संपत्ती आली आहे तर तुमच्या वाट्यास दारिद्र्य आले
आहे. म्हणजेच संपत्तीची विभागणी न्यायाची झाली नाही आणि ती कशी
करावयाची हाच आपला आज जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गावाजवळील रानातील पडित जमीन आपणास कसण्यास मिळावी म्हणून आपण सरकारकडे मागणी केल्यास ती जमीन आमच्या गुराढोरांच्या चाऱ्याकरिता पाहिजे म्हणून ती
आपल्याला देण्यात येऊ नये, असा प्रयत्न गावातील लोक करतात व ती जमीनदेखील आपल्याला लाभू देत नाहीत. ज्यावेळेस माझी व मुख्यमंत्री ना. खेर यांची भेट झाली होती त्यावेळेस याबाबतीत मी त्यांना विचारले की