३१-१२-१९३७ जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा - Page 106

६८ ` डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गावातील लोकांच्या गाईम्हशीपेक्षाही आमचे जीव कमी किंमतीचे आहेत काय ? सरकारने आमच्या लोकांच्या जीवाकडे न पाहता गावच्या गुराढोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी का ? सरकारने प्रथम माणसांचा जीव वाचविला पाहिजे व नंतर जनावरांचे जीवित्व रक्षण केले पाहिजे. तुम्हाला सांगावयाचे म्हणजे एवढेच की आज तुमची किंमत जनावरापेक्षाही कमी आहे. आज शेठ सावकारांचे सर्व वाली आहेत. गरिबांचे वाली कोणी नाही. गरिबांचे वाली गरीबच आहेत आणि गरिबांना जर आपली स्थिती सुधारून घ्यावयाची असेल तर त्यांनी कायदे करण्याची जी राजकीय सत्ता ती हस्तगत केली पाहिजे. ते जर कायदेमंडळात निस्वार्थी लोक पाठविणार नाहीत तर त्यांची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला कायदे मंडळात आपल्या हिताचे कायदे करून घेणारे लोक पाठविता आले पाहिजेत व त्याकरिता नेहमी संघटित राहिले पाहिजे. त्या करिताच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली आहे. आज कायदे करणारे सरकार काँग्रेसचे आहे. ती काँग्रेस म्हणजे एक

विश्वामित्राची मायावी सृष्टी आहे, तेथे मुक्तेश्वराने वर्णन केल्याप्रमाणे उंदीर मांजरीचे दूध पीत आहे, वाघ शेळी एका शय्येवर झोप घेत आहेत, मुंगूस सापाचे पटापट मुके घेत आहे. तेथे शेठ सावकार लोक कुळांचे हित साधू म्हणून सांगत आहेत. भांडवलदार मजुरांचे कोटकल्याण करू म्हणून बरळत आहेत. ते बोलणे किती फाल आहे, ती जनतेची कशी फसवणूक आहे, हे गरीब लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही. शेठ सावकार हे आपले हितशत्रू आहेत, याचे आपल्यास उपजत ज्ञान आहे. काँग्रेस लोकांची अशी फसवणूक करीत असल्यामुळे मी तिच्यात सामील झालो नाही आणि म्हणूनच तुम्हालाही सांगत आहे की तुम्ही काँग्रेसपासून अगदी दूर राहा.

तुमच्या हिताचे कायदे आणणे व त्याकरिता झगडणे हे माझे कर्तव्य आहे व ते मी करीन, असे मी तुम्हाला आश्वासन देतो. मी माझ्या कर्तव्यास जागेन पण त्याच वेळेस तुम्ही तुमच्या कर्तव्यास जागले पाहिजे, हे मला तुम्हास सांगावयाचे आहे. तुम्ही आपली चळवळ जोमदार केल्याशिवाय आपल्यास यश लाभणार नाही व आपले जीवित सुखाचे होणार नाही.

तिसरा प्रश्‍न आपण आपल्या उन्नतीचे कार्य करीत असता आपल्यावर जो जुलूम होतो त्याचे कसे निवारण करावयाचे ? तुम्हाला माहीत आहे की आपल्या विरुद्ध सर्व जग आहे आणि त्याला तोंड द्यावयाचे म्हणजे ते दोन प्रकाराने द्यावयास हवे. प्रथमतः आपण प्रत्येकाने आपल्या मनातील भीती नाहीशी केली. पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम