११५
साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी
मैत्री जमेल का ?
सोमवार, ता. १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेब्लीच्या बैठकीस
मुंबई कौन्सिल हॉलमध्ये सुरवात झाली. या बैठकीच्यावेळी असेंब्ली हॉलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी करण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष व इतर शेतकरी संस्थांनी सहकार्य करून एक “मोर्चा कमिटी “ निवडून तिच्या नेतृत्वाखाली हा
शेतकऱ्यांचा अपूर्व मोर्चा कौन्सिलवर नेण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे ता. १० रोजी वरील ठिकाणचे सर्व शेतकरी आपल्या मिरवणुकी घेऊन दुपारी दीड वाजता आझाद मैदानावर जमले. कोकणातून आलेले शेतकरी बांधव व्हिक्टोरिया डॉकमधून थेट बोरीबंदरपुढील मैदानावर आले. इतर शेतकऱ्यांचे गट परळ येथील कामगार मैदानावर जमून ते प्रचंड मिरवणुकीने आझाद मैदानावर आले. या मिरवणुकीबरोबर '' खोती पद्धती नष्ट करा “, “ सावकारशाहीला मूठमाती द्या “, " शेतकऱ्यांचा विजय असो " वगैरे आशयाच्या मोठमोठ्या पताका फडकत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकारही करण्यात येत होता. अशा थाटामाटात ही मिरवणूक काळबादेवी मार्गाने येत असता येथील व्यापारी लोकांचे धाबे दणाणले. काँग्रेससारख्या अधिकारारूढ सत्तेविरुद्ध हे शेतकऱ्यांनी संघटित उभारलेले बंड पाहून त्यांना भीती व आश्चर्य वाटल्यास नवल नाही. ही मिरवणूक आझाद मैदानावर आली तोच चौपाटी मार्गाने मुंबईतील “ बालू “ लोकांची तिसरी मिरवणूक या शेतकऱ्यांच्या मिरवणुकीत सामील झाली. त्याशिवाय ठाणे-कल्याण वगैरे ठिकाणचे शेतकरी निरनिराळया मार्गाने आझाद मैदानावर येत होते. डॉ. भोईर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव अगदी सकाळीच दादरवरून कामगार मैदानावर हजर झाले होतेच. अशा रीतीने हा जमाव वाढत वाढत वीस ते पंचविस हजारापर्यंत शेतकरी बांधव आझाद मैदानावर मिरवणुकीला तयार झाले. या प्रचंड मिरवणुकीची शिस्त राखण्यासाठी भाई चित्रे, याज्ञिक, परुळेकर, पोतनीस, प्रधान, मिरजकर, लालजी पेंडसे, सुरबा टिपणीस, मडकेबुवा जाधव, राजाराम भोळे, डॉ. भोईर वगैरे मंडळी हजर होती. त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना आजच्या इतिहासप्रसिद्ध शेतकऱ्यांच्या मोर्च्याविषयी सविस्तर माहिती निवेदन केली.
I य Nd
जनता : १५ जानेवारी १९३८.