साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का ? ७३
इतक्यात ही मिरवणूक कोणत्या मार्गानि व कशी न्यावी या विषयाचा पोलिस कमिश्नरचा हुकूम घेऊन ए. डिव्हीजन पोलिसं इन्स्पेक्टर आले. पोलिसांनी ही मिरवणूक कौन्सिल हॉलवरून नेण्यास व ती मध्ये कुठेही न थांबविता आझाद मैदानावर आणण्यास मिरवणुकीच्या कार्यकर्त्या मंडळींना कळविले. याविषयी शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांमध्ये बराच विचारविनिमय होऊन पोलिसांचे म्हणणे मान्य करणे भाग पडले. मात्रे या मिरवणुकीपैकी निदान वीस प्रतिनिधींना ना. मुख्य प्रधानांना भेटून शेतकऱ्यांचे म्हणणे कळविण्याची परवानगी मागितली. ही परवानगी पोलिस कमिश्नराने तात्काळ दिली. अशा रीतीने मेयो रोडच्या मार्गाने, कूपरेजजवळून कौन्सिल हॉलला वळसा देऊन म्युझिअमवरून ही २०-२५ हजार शेतकऱ्यांची प्रचंड मिरवणूक गगनभेदी जयघोष करीत पुन्हा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानावर आली. या एवढ्या मिरवणुकीची शिस्त व संघटना पाहून कुणालाही कौतुक वाटल्यावाचून राहाणार नाही. आम्हाला वाटते की, सुव्यवस्था व कायदा खात्याच्या सर्वाधिकाऱ्यांनी मुंबईचे सारे पोलिस या मिरवणुकीच्या कडेकोट बंदोबस्तास ठेविले होते. अशाच प्रकारचा बंदोबस्त १९३१ साली काँग्रेसने पुकारलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत नोकरशाही सरकारने ठेविला असताना काँग्रेसच्या नारिंगी वेषधारी देशसेविका हा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहून “ हे जुलमी सरकार नय रखना “ म्हणून गीत गात असत आणि आता त्याच गीताचे सूत्रधार गोरगरिबांच्या शांततेच्या, योग्य व न्याय्य मागणीच्या मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट - बंदोबस्त ठेवण्यास कारणीभूत झालेले पाहून कुणाही विचारी माणसांना आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. तसेच ही किसानांची प्रचंड मिरवणूक कोन्सिल हॉलवरून जात असताही या गोरगरिबांच्या कनवाळू म्हणविणाऱ्या काँग्रेस सरकारला त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याची देखील पर्वा वाटली नाही. ही काँग्रेसच्या मंडळींची वागणूक त्यांना वाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या आस्थेविषयीची खात्रीने साक्ष पटवील.
शेवटी ही मिरवणूक पुन्हा आझाद मैदानावर आल्यावर, स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरविण्यात
आली. यापूर्वी ना. खेर यांनी शेतकऱ्यांच्या वीस प्रतिनिधींना सायंकाळी ७ वाजता मुलाखत देण्याचे आश्वासन दिले होते. आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या
सभेत भाई चित्रे यांचे भाषण झाले. भाई चित्रेप्रमाणे कॉ. याज्ञिक, द. वि. प्रधान,
लालजी पेंडसे, मिरजकर, टिपणीस वगैरे पुढारी मंडळींची जोरदार भाषणे
झाली. त्यांच्या भाषणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करावयास उभे राहाताच त्यांच्या
नावाचा जयघोष करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले.