१०-१-३८ साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मेत्री जमेल का ? - Page 112

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ७४

कष्टाळू लोकांची संघटना करावयाची झाल्यास त्यात जातिभेद. धर्मभेद यांना मुळीच थारा मिळता कामा नये. हा कष्टाळू वर्ग अगोदरच बिकट आर्थिक

आहे तीत दडपणाने दडपला गेलेला आहे. अशा परिस्थितीत जी संघटना झाली मी म्हणत आहे त्याप्रमाणे विषमता दिसता कामा नये आणि आज मी म्हणत आहे अशा तऱ्हेचे सर्व जातींच्या कष्टाळू वर्गाचे हे संघटन पाहून मला आनंद होत आहे. म्हणूनच आजचा दिवस मी मोठ्या भाग्याचा समजतो. कारण की आजची आपली ही संघटना केवळ स्वार्थत्यागाच्या बळावर उभारलेली आहे. श्रमजिवी वर्गाने यासाठीच श्रीमंत वर्गाच्या म्हणजेच काँग्रेससारख्या पक्षाशी सहकार्य करून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोगी नाही. आपणास माहितच आहे की या जगात ज्याचे घर पेटते, ज्याच्या घराला आग लावली जाते त्याचे व जो आग लावतो त्याचे कधी तरी संगनमत होईल काय? आपण साधारणपणे प्राणीमात्राकडेही दृष्टी फेकली तरी साप व मुंगूस कधीतरी एकत्र होऊ शकतील का ? तसेच उंदीर-मांजराची मैत्री जमेल का ? अशारितीने निसर्गाविरुद्ध सृष्टी निर्माणं करणाऱ्याविषयी आपण कधी तरी विश्वास बाळगाल का? आणि आपण त्याच दृष्टीने श्रीमंतांची पाठीराखी काँग्रेस हिच्याकडे पाहिले पाहिजे.

आपण मुंबई असेंब्लीमधील काँग्रेसच्या सभासदांकडे पाहा. बहुतेक सारे निवडून आलेले सभासद सावकार, जमीनदार, खोत आणि श्रीमंत असे लोक

आहेत. ते आपल्या हिताविरुद्ध काँग्रेसला काहीच करू देणार नाहीत. त्यांच्यापैकी कित्येकांची सावकारी ५० हजारांच्या वर आहे आणि हे व्याजबट्ट्याने आपले धन वाढविणारे लोक आपणासारख्या श्रमजिवी वर्गाच्या कल्याणाची गोष्ट कशी करू शकणार ? तुम्ही आपल्या मनात पक्की खात्री ठेवा की हे असेंब्लीमध्ये काँग्रेसच्या कृपाप्रसादाने निवडून आलेले सभासद तुमच्या हितसंबंधाच्या कोणत्याही गोष्टी करणार नाहीत. आपण १९३७ साली या काँग्रेसच्या प्रतिनिधींना निवडून दिलेत त्यावेळी हे लोक आपली कशातऱ्हेने पायधरणी करीत होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या हिताचा प्रश्‍न आम्ही प्रथम हाती घेऊ, तुमच्या सुखासाठी काँग्रेसने फकिरी पत्करली आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन आपण काँग्रेसलाच मते द्या, असे म्हणणारे हे निवडून आलेले प्रतिनिधी तुमच्याकडे आता ढुंकूनही पाहावयास तयार नाहीत. म्हणून मी म्हणतो आपण या तोंडपुजे

लोकांची यापुढे मुळीच पर्वा करू नका.

असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे आणि आपला खरा हितकर्ता कोण हे. निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे, याची तुम्हीच निवड करा.