७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सहाय्य करू नका आणि ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा की काँग्रेस या दुखवून तुमचे हित करणार नाही. तसेच तुम्ही येथे जमलेले नि जातीचे लोक आजपर्यंत आपापल्या जातीच्या निरनिराळ्या संघटना करून कार्य करीत होता. त्यामुळे श्रमजिवी म्हणून एका वर्गाची एकत्रित अशी संघटना झाली नव्हती. परंतु ती संघटना यापुढे होण्याचे भाग्य दिसू लागले आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट होय.
श्रीमंत वर्गाला सहाय्य करणाऱ्या काँग्रेसला कोणत्याही प्रकारे सहाय्य करून आपले हित होणार नाही, हे आजची प्रत्यक्ष परिस्थितीच सांगत आहे. गेल्या असेंब्लीच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र मजूर पक्षातर्फे काँग्रेसशी दोन हात करून जशा निवडणुकी लढविल्या व जे थोडेफार यश मिळविले तसेच जर कम्युनिस्टादी जहाल पक्षातील पुढाऱ्यांनी आचरण केले असते तर त्यांनाही निवडणुकीत थोडेफार यश मिळून त्यांचे सहाय्य आम्हाला आज असेंब्लीमध्ये झाले असते. ' परंतु त्यांनी यापुढे तरी आपले कर्तव्यकर्म बजावण्यास मुळीच कुचराई करता कामा नये. तसेच माझ्या कम्युनिस्ट मित्रांना दोन हिताचे शब्द सांगणे अयोग्य होणार नाही, असे मला वाटते. मी या कम्युनिस्टांच्या तत्त्वज्ञानाची येथील सर्व पुढाऱ्यांपेक्षा खात्रीने अधिक पुस्तके अगदी अभ्यासपूर्वक वाचली आहेत. त्या पुस्तकावरून पाहता कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान कितीही सुंदर असले तरी त्याचा कितपत उपयोग करता येइल, हे पाहिले पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्य केल्यास रशियन लोकांना जे यश मिळवावयास बरेच श्रम व कालावधी लागला तितका हिंदुस्थानातील परिस्थितीमुळे लागणार नाही, असे मला वाटते आणि म्हणून मला श्रमजिवी वर्गाच्या चळवळीच्या लढ्याबाबत कम्युनिस्ट तत्त्वज्ञान अधिक जवळचे वाटते. आपली परिस्थिती अशी आहे की आपणाजवळ आज धन नाही. आपल्या चळवळीचा सर्वत्र ठिकाणी प्रचार करण्याकरिता एखादे प्रभावी दैनिक वर्तमानपत्र नाही. सरकारचे सहाय्य मिळण्याची आशा नाही. म्हणून आपण आपली स्वतंत्र आणि संघटित अशी संघटना करा आणि आपला लढा सर्व प्रकारचे भेद विसरून लढविण्यास धैर्याने तयार व्हा, हीच विनंती.
मुंबई सरकारपुढे सादर केलेल्या मागण्या
मूलभूत मागण्या |
(१) शेतकरी वर्गाला स्वतंत्रपणे व सुखासमाधानाने राहाता यावे म्हणून जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणाऱ्यालाच त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे.
(२) जमिनीची मशागत करून तीवरच जगणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल व त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था व्हायची असेल तर खोत-इनामदारासारखे मध्यस्थ नसले पाहिजेत.