१२-२-१९३८ चातुर्वर्णामुळे हिंदुस्थानचा ऱ्हास व अध:पात झाला - Page 120

८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या सभेत जुजबी भाषण न करता जरा वेगळे करणार आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास हिंदुस्थानात आजपर्यंत प्रजासत्ताक राज्यपद्धती अंमलात आली नव्हती, अनेक ग्रंथांच्या वाचनाने मला जी माहिती मिळाली आहे त्यावरून स्पष्ट असे दिसून येते की, हिंदू राष्ट्राचा -हास व अधःपात हिंदुंना मान्य असलेल्या चातुर्वर्ण्यामुळेच झाला आहे. चातुर्वर्ण्याची प्रथा सुरू होऊन आज जरी अनेक शतके झाली असली तरी त्या प्रथेची पाळेमुळे हिंदू संस्कृतीत खोलवर जाऊन भिडली असल्याने तिचे अनेक दुष्परिणाम हिंदुस्थानास भोगावे लागले आहेत

चातुर्वर्ण्याची शिकवणूक म्हणजे ब्राह्मणांनी विद्या शिकावी व शिकवावी क्षत्रियांनी लढण्याचे काम करावे, वैश्यांनी व्यापार उदीम करावा व शूद्रांनी सेवा करावी. या पद्धतीमुळे आपल्या राष्ट्राचे कसे व किती नुकसान झाले हे चांगल्या शिकल्यासवरलेल्यांनाही अजून नीट उमगत नाही. या देशातील बहुसंख्यांक असा वर्ग अजिबात बाजूला टाकून देण्यात आला. त्यामुळे राष्ट्राच्या स्वातंत्र्याला पोषक असा असलेला बहुसंख्यांक वर्ग निकामी ठरला तर हा देश नेहमीच परक्यांच्या पारतंत्र्यात लोळत राहिला असल्याचे दृश्य दिसेल. काही दिवस स्वातंत्र्य भोगिल्यानंतर ग्रिकच्या अलेक्झांडर राजाने हिंदुस्थानावर स्वारी करून हिंदुस्थानात आपली राज्ये स्थापिली. तद्‌नंतरच्या अल्प काळात थोडे स्वातंत्र्य मिळून मराठेशाही स्थापन होते न होते, पेशवे सर्व कारभार आपल्या हातात घेतात न घेतात तोच शेवटी सर्व देश इंग्रजांच्या गुलामगिरीत पुन्हा ढकलतात. आजच्या प्रसंगी जमलेल्या तुम्हा सर्वाना मी असे विचारतो की, या देशाला भाग्याचे दिवस सतत का लाभले नाहीत ? इतर देशाचे इतिहास आपण पाहिल्यास तेथे अशी स्थिती आपणास आढळणार नाही याचे कारण काय ? या गोष्टीचा आपण बारकाईने विचार केल्यास हिंदुंच्या धर्मगुरूंनी अर्थात ब्राह्मणांनी हिंदुस्थानावर लादलेल्या चातुर्वर्ण्याच्या चौकटीमुळेच हा अनर्थ ओढवून घेतला आहे |

तुम्हा सर्वाना एक. गोष्ट सहज पटण्यासारखी आहे. कल्पना करा की एखाद्या गावावर पठाणांचा हल्ला आल्यास सर्व जातीचे लोक हातात शस्त्र धारण करून संघटनेने हा हल्ला परतवू लागले तर हल्ला परतविता येईल. ज्याच्या हातात तलवार आहे असे लोक आपल्यावरील जुलूमाचे हल्ले परतवितात. परंतु त्याऐवजी जर फक्त चार लोक तलवार हातात घेतील व इतरांना खुरप्यालाही हात लावण्यास धैर्याने मनाई. करतील तर त्यामुळे राष्ट्राचे संरक्षण कसे करता येईल ?