१०० डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ज्या टीकाकारांनी तुमच्यावर व माझ्यावर दुष्ट हेतू असल्याबद्दल टीका केली त्यांना मी दोन अगदी साधे प्रश्न विचारू इच्छितो. हे आमचे गाऱ्हाणे खरे आहे की खोटे आहे ? दुसरा प्रश्न असा की. हे गा-हाणे खरे असेल तर त्यापासून ज्यांना यातना भोगाव्या लागत आहेत त्यांनी त्यापासून मुक्त होण्यासाठी संघटित होऊ नये काय? या दोन प्रश्नांचे उत्तर जर होकारार्थी असेल-कोणीही प्रामाणिक माणूस याला दुसरे उत्तर देऊ शकेल असे मला वाटत नाही-तर आमचा हा प्रयत्न पुरेसा न्याय्य आहे. आम्हाला दोष देणाऱ्या कामगार पुढाऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा भ्रम झालेला आहे. कार्ल मार्क्स वाचल्यामुळे त्याना एवढेच माहीत आहे की समाजात फक्त कामगार आणि मालक असे दोनच वर्ग असतात. मार्क्स वाचून ते असे गृहीत धरतात की भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम सुरू करतात. या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे तिला वास्तविक समजण्याची पहिली चूक ते करतात. कोणत्याही समाजात नोकर आणि मालक असे केवळ दोनच स्पष्ट वर्ग असतात, असे मार्क्सने कोठेही म्हटलेले नाही. सर्व समाजातील माणसे अर्थप्रवृत्तीचे किंवा बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय असतात हे म्हणणे जसे खोटे आहे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. मानवाची अर्थप्रवृती ही मूलभूत बाब समजून निष्कर्ष काढताना अर्थशास्त्रज्ञ नेहमीच एक शहाणपणाची सूचना देत असतात. ती ही की, जर इतर सर्व परिस्थिती समान राहिली तर माणसाची अर्थप्रवृत्ती स्पष्टपणे अस्तित्वात असते. कामगार पुढारी ही मूलभूत बाब विसरून गेले. मार्क्सने जे सांगितले ते युरोपच्या बाबतीत बरोबर होते, असे समजणेही चूक आहे, ' जर्मनीमध्ये गरीब व पिळवणूक झालेला माणूस आहे काय? ते एकाच वंशाचे, एकाच देशातले, समान भूतकाळ व वर्तमानकाळ असलेले आहेत व त्यांचे भवितव्यही सारखेच राहाणार आहे. तर त्यांनी संघटित व्हावे” हा उपदेश मार्क्सच्या काळापासून भाषणातून देण्यात येत आहे. जर्मनीतील गरीब नाडलेला माणूस आणि फ्रान्समधील लुबाडलेला शेतकरी मग संघटित झाला काय ? १०० वर्षे लोटून गेली तरी ते संघटित होण्याचे शिकले नाहीत आणि मागील महायुद्धात ते उघडपणे परस्पराशी निर्दय शत्रुप्रमाणे लढले. भारताच्या बाबतीत तर हा विचार स्पष्टपणे चुकीचा आहे. भारतामध्ये असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्म अस्तित्वात नाहीत. सर्व कामगार एक असून त्यांचा एक वर्ग आहे, ही घोषणा आदर्शरूप असून ती प्रत्यक्षात उतरावयाची आहे म्हणून ती वस्तुस्थिती आहे असे समजून