१०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे, अशी मला भीती वाटते आणि ते जर अशाप्रकारे संघटित झाले तर त्याने काय नुकसान होणार आहे ? या संघटनेवर जर मालक लोकांचे नियंत्रण असते तर या संघटनेविरुद्धच्या कांगाव्याला काही अर्थ आहे, असे मला वाटू शकले असते. आम्ही मालक लोकांच्या हातातील बाहुले आहोत किंवा आम्ही त्यांच्या कलाने वागत आहोत किंवा कामगारात फूट पाडण्यासाठी आम्ही मुद्दाम हे संघटन उभारीत आहोत, असे जर सिद्ध करण्यात आले असते तर या परिषदेची निंदा बरीचशी न्याय्य ठरली असती. निश्चितच, अशाप्रकारचे वर्तन म्हणजे विश्वासघातच ठरला असता. परंतु आमच्या या चळवळीवर मालक लोकांचे नियंत्रण असून ती मालकांना मदत करण्यासाठी आहे किंवा कामगारांच्या हिताचा नाश करण्यासाठी ती आहे, असे कोणीतरी म्हणू शकेल काय ? आमच्या कोणत्याही टीकाकाराला हे सिद्ध करण्याचे मी आव्हान देत आहे.
त्यामुळे ही परिषद भरविल्याबद्दल खजील होण्याचे किंवा कोणाची माफी मागण्याचे काही कारण नाही. आपला हेतू व त्यामागील कारणे पुरेशी न्याय्य आहेत. ही परिषद ज्यांना पसंत नाही अशा दलित वगपिकीही एक-दोन व्यक्ती आहेत. परंतु त्यात नवीन असे काहीही नाही. त्यांच्यापैकी काही दुसऱ्याच्या हातातील बाहुले असून पैसे चारून विरोधासाठी मुद्दाम तयार केलेले आहेत. तर काहींना पथभ्रष्ट करण्यात आले आहे. दलित वर्ग हा स्वत: इतका दुर्बल आहे आणि कामगारांचे ऐक्य हा शब्दच इतका आकर्षक आहे की आणि त्यातही एखाद्या प्रभावकारी प्रचारकाच्या तोंडून तो ऐकण्यात आल्यामुळे आपल्या लोकांना त्याची भुरळ पडल्यास नवल नाही. परंतु असे लोक हे विसरतात की ज्या गटांमध्ये इतक्या परस्परविरोधी भावना व वृत्ती प्रत्येक बाबतीत आहेत आणि त्यातील एक गट दुसऱ्याच्या हिताविरोधी होईल अशा हक्कांचा व अधिकारांचा स्वतःसाठी जेथे दावा करीत आहेत तेथे कामगारांचे खरेखुरे ऐक्य राहूच शकत नाही. यातील ऐक्य म्हणजे दुर्बल व पिळलेल्या लोकांना फसविण्यासाठी केलेले केवळ एक ढोंग-देखावा आहे. त्यांची या भोंदू लोकांकडून फूटपाड्या म्हणून निंदा करण्यात येते. फूट, खरेच ! ती फूट असेलही, परंतु ती अशी फूट आहे की जेथे खराखुरा विरोध व मतभेद अस्तित्वात आहे ! हा विरोध निर्माण होण्याचे साधे कारण असे की कामगारांचा एक गट दुसऱया कामगारांच्या म्हणजे दलितवर्ग कामगारांच्या विरोधात आपणाला खास हक्क आहेत, असा दावा करतो. कोणालाही केवळ मतभेदासाठी मतभेद निर्माण करण्याची खुशी नसते. आम्ही केवळ आधीच असलेली फूट नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करीत असून आमच्यावर सुरू असलेल्या अन्यायाला आळा घालून या फुटीला पायबंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.