१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 144

१०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नाही. ही तुमची संघटना एखाद्या कामगारांच्या समान उद्देशांच्या व समान कार्याच्या केन्द्रीय संघटनेशी तुम्ही जोडूनही देऊ शकता. जर तुमची स्वतंत्र संघटना तुम्ही उभारू शकत नसाल तर सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या. संघटनेत तुम्ही सहभागी होऊ शकाल. परंतु अशी संघटना आपल्या स्वत:च्या कार्यासाठी तुमचा दुरुपयोग करून घेणार नाही, याची काळजी घ्या. असे घडण्याचा धोका फारच मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईच्या कापड गिरण्यात असेच घडले होते. तेथे विणकरांच्या हितासाठी लागोपाठ संप पुकारण्यात येत असे आणि त्या संपाला कताईवाले पाठिंबा देत राहिले. हे टाळण्यासाठी तुम्ही दोन शर्तीसाठी आग्रह धरला पाहिजे. प्रथमतः तुम्ही कार्यकारी मंडळामध्ये खास प्रतिनिधित्वाचा आग्रह धरावा. म्हणजे तुमच्या संबंधित खास प्रश्‍नांकडे संघटनेचे लक्ष तुम्हाला वेधून घेता येईल व पाठिंबाही 'मेळेल. दुसरी अट अशी

की तुमच्या वर्गणीपैकी काही भाग आवश्यकता पडल्यास केवळ तुमच्या तक्रारी

निवारण करण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. जर तुम्ही तुमची स्वतःची संघटना उभारण्याचा निर्णय घेतला नाही व दुसऱ्या एखाद्या संघटनेत सामील होण्याचे ठरविले तर या दोन अटी तुम्ही मान्य करून घेतल्या पाहिजेत.

कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे यात काही किन्तु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राजकीय उद्दिष्टांसाठीही संघटित झाले पाहिजे. केवळ कामगार संघटनेच्या बळावर मालकांच्या विरोधात कामगार विजयी होऊ शकत नाहीत, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. कामगार संघटनांनी राजकारणात शिरावे की शिरू नये याबद्दल आज दुमत असू शकत नाही. कामगार संघटनांनी राजकारणात शिरलेच पाहिजे कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हितांचे रक्षण करणे अशक्य आहे. इतकेच नव्हे तर कमीतकमी मजुरीचे दर, कामाच्या वेळा, अन्य नियम इत्यादी सामान्य स्वरूपाच्या सुधारणा केवळ संघटनेच्याद्वारे घडवून आणणे अशक्य आहे. संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.

केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांचे रक्षण करणे हा एकच राजकारणामध्ये शिरण्याचा हेतू नसावा. तुम्ही आपला हेतू केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांपुरताच मर्यादित ठेवणे म्हणजे प्राप्त कर्तव्यालाच ध्येय समजण्यासारखे आहे. गुलामगिरी हा नशिबाचा खेळ असून कामगार वर्ग त्यातून सुटू शकत नाही, हे गृहीत धरून चालण्यासारखेच हे आहे. याउलट ही मजूरपद्धती बदलून