७-३-१९३८ गुन्हेगार आरोपीला दिलेली शिक्षा तहकूब करणे म्हणजे कायद्याचे उच्छेदनच - Page 163

गुन्हेगार आरोपीला दिलेली . . . . कायद्याचे उच्छेदनच १२५

घेऊन प्रस्तुत प्रकरणातील सारा इत्थंभूत प्रकार तिच्यापुढे मांडण्याचे त्यांनीच नाकारले आहे. त्यांनी जर हा प्रकार तसा मांडला 'असता, तर ठरावाच्या

प्रवर्तकांनी तो बहुधा मागेही घेतला असता, नाही तर कदाचित इतर सभासदांनीही चर्चेत भाग घेण्याची आपली खुषी नाही, असे सांगितले असते. तथापि, गृहमंत्र्यांनी असे काही केले नसल्याने ही चर्चा जर व्यर्थ असल्याचे [पुढे ] आढळून आले, तर त्याबद्दलच्या दोषाला मी वर म्हटल्याप्रमाणे गृहमंत्रीच [पात्र ] [होतील. ]

वृत्तपत्रांवरून जी काही माहिती आम्हाला समजली आहे, तेवढ्यावर विश्वासून या प्रकरणी विचार करता प्रमुख मुद्दा उद्‌भवतो तो असा की, गुन्हेगारांची शिक्षा थोपवून धरण्यास सभेला रास्त अतएव ग्राह्य वाटू शकेल, असे काही समर्थनीय कारण झाले आहे काय ? ना. गृह मंत्री यावर असे सांगतील की, हायकोर्टाला शिक्षा तहकुबीचा अधिकार नाही, सबब हायकोर्टाने शिक्षा तहकूब करण्याचे नाकारले, हे शहाणपणाचे झाले किंवा मूर्खपणाचे झाले, या बाबतीचा प्रश्‍न येथे उद्भवतच नाही, खरा प्रश्‍न तो नाही. मुद्याचा व महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की, कायदेशीरपणे शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचे अथवा ` रद्द करण्याचे जे अधिकार गृहमंत्र्यांकडे सोपविले आहेत, त्यांची त्यांनी योग्य रीतीने अंमलबजावणी केली की नाही ? तारतम्य पाहण्याची जी सवलत खास हक्क म्हणून वाटेल तर त्यांना आहे ती त्यांनी रास्त रीतीने उपयोगात आणली किंवा नाही ? ना. गृहमंत्री यांनी आपल्या ह्या हक्कांची योग्यपणे अंमलबजावणी केली किंवा नाही हे अजमावण्यासाठी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

वृत्तपत्रातील माहितीप्रमाणे या बाबतीतील पहिली गोष्ट चटकन लक्षात येते ती अशी की, हे प्रचंड प्रमाणावर जुगार खेळणारे लोक दरिद्री नव्हते, हे खास. पोटाला भाकर मिळविण्याचा काहीच अन्य उपाय नाही, म्हणून जुगारासारख्या या निंद्य कृत्याकडे वळणे त्यांना भागच पडले अशातली मुळीच गोष्ट नाही. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतावरून असे दिसते की, हे लोक श्रीमंत बनिया आहेत, त्यांच्यापाशी जंगी भांडवल आहे, अनेक कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत, शंहरातील निरनिराळ्या भागात व त्याचप्रमाणे हिंदुस्थानातीलही निरनिराळ्या विभागात त्यांच्या मुख्य कचेऱ्या आहेत, एकंदरीत फार प्रचंड प्रमाणावर त्यांचा व्यापार चालू आहे. यामुळे ह्या लोकांच्या बाबतीत, दारिद्र्यामुळे अथवा बिकट प्रतिकूल परिस्थितीमुळे जुगाराचा मार्ग त्यांना दुर्दैवकरून अवलंबणे भागच पडले, असे खचित म्हणता येणार नाही. दिसून आलेली वस्तुस्थिती साफ विरुद्ध असल्यामुळे वरील प्रकारचे कारण या लोकांच्या