२७-४-१९३८ दंग्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक - Page 180

१४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नाही. १८५१ पासून ते १९३८ पर्यंत एकंदर भयंकर्‌ स्वरूपाचे असे जातीय दंगे मुंबईत ९ झाले. त्यातील पहिला दंगा १८५१ साली मुसलमान व पारशी यामध्ये झाला. दुसरा सुद्धा १८७४ साली पारशी व मुसलमान यांच्यामध्ये झाला. त्यानंतर झालेले दंगे १८९३, १९२९, १९३२, १९३३, १९३६, १९३७ व १९३८ यावर्षी झाले. हे सर्व दंगे मात्र हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये झालेले आहेत. या सर्व दंग्यात किती जखमी झाले याची आकडेवारी सांगितल्यावर डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की, या दंग्यांच्या वृत्तीकडे पाहिल्यावर त्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी कडक उपाय योजना अंमलात आणणे भाग आहे. दरसाल या सुधारणेच्या मार्गास लागलेल्या मुंबई शहरात रक्तस्नानाचे प्रकार घडावे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय आणि याचा योग्य बंदोबस्त होण्याकरिता मी या बिलाला पाठिंबा देत आहे. तसेच या बिलामुळे पोलीस कमिश्नरला जे नवीन हक्क मिळणार आहेत त्यांच्यापासून नागरिकांच्या स्वातंत्र्याचे योग्य संरक्षण व्हावे म्हणून ही उपसूचना या बिलाला जोडीत आहे, म्हणूनच मी माझ्या उपसूचनेत आणीबाणीच्या वेळी अगोदर जाहीरनामा काढूनच उपाययोजना अंमलात आणावी असे सुचविले आहे. तसेच या अंमलबजावणीची मुदत एक महिन्याची ठेवावी, अशी जी सूचना मांडली आहे त्यामुळे पोलीस कमिश्नरच्या अधिकाराचे क्षेत्र फक्त या जातीय दंग्याच्या कालापुरतेच मर्यादित राहील. ना. मुन्शी यांनीही आपल्या भाषणात या कायद्याचा जातीय दंग्याशिवाय उपयोग करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. डॉ. आंबेडकरांची सूचना बहुमतानी पास झाल्यावर या बिलाचे पहिले वाचन पास झाले.